मुंबई : राज्यात रस्ते अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिवहन विभागाला सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांच्या सोबत त्यांनी एक उपाय ही परिवहन विभागाला सुचवला आहे. अनेक महामार्गावर पहाटेच्या वेळी अनेक अपघात झालेले पाहायला मिळतात. अनेक वाहन चालक दूरचा प्रवास करत असताना त्यांची झोप पूर्ण झाली नसेल तर डुकली येते किंवा झोप लागते. अशावेळी अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. यावरती उपाय योजना करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाला दिलेली आहे. 


या सूचनेनुसार परिवहन विभाग एका मोठ्या नामांकित कंपनीच्या माध्यमातून सॉफ्टवेअर तयार करत आहे. हे सॉफ्टवेअर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. वाहन चालकाच्या अगदी समोरच या सॉफ्टवेअरचा कॅमेरा बसवला जाणार आहे. हा कॅमेरा वाहन चालकाच्या डोळ्यांची एक प्रकारे निगराणी करणार आहे. वाहन चालकाचे डोळे झाकत असेल किंवा त्याला डुकली येत असेल तर संपूर्ण गाडीमध्ये सायरन वाजायला सुरुवात होईल. सायरण वाजताच वाहन चालक सावध होऊन अपघात टाळू शकतो. या सॉफ्टवेअरमुळे अपघात टाळण्यास मदत होईल, असं अनेक वाहन चालकांनी म्हटलं आहे.


राज्यातील महामार्गावरील अपघातांची आकडेवारी



  • राज्यात 2019 मध्ये 32 हजार 925 अपघात झाले. त्यात 12 हजार 788 जणांचा मृत्यू झाला तर 28 हजार 628 जण जखमी झालेत.

  • 2020 मध्ये 24 हजार 971 अपघात झालेत. त्यात 11 हजार 569 जणांचा मृत्यू झाला आणि 19 हजार 14 जण जखमी झालेत.


या सॉफ्टवेअरमुळे अनेक अपघात टळले जाऊ शकतात. हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी एक नामांकित कंपनी काम करत आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत हे सॉफ्टवेअर तयार करून मुख्यमंत्र्यांना याचं सादरीकरण केल जाणार असल्याचं परिवहन विभागाचे आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितलं आहे. हे सॉफ्टवेअर अपघात रोखण्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे येत्या काळात हे सॉफ्टवेअर किती उपयोगी ठरणार हे स्पष्ट होईल.