गटारीत उतरुन आंदोलन करणं पडलं महागात!
एबीपी माझा वेब टीम | 21 Jul 2016 03:06 AM (IST)
मालेगाव: मालेगावातील गटारांच्या प्रश्नावर महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी केलेलं आंदोलन एका सामाजिक कार्यकर्त्याच्या चांगलंच अंगलट आलं. भ्रष्टाचारमुक्त मालेगाव संघटनेच्या रिझवान बॅटरीवाला यांनी अफलातून पद्धतीनं गटारीत उतरुन आंदोलन केलं. पण गटारातील खोलीचा अंदाज न आल्यानं रिझवान गटारीत बुडू लागले. रिझवान कमरेपर्यंत गटारीत गेल्याचं लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी धावाधाव करत त्यांना पकडून ठेवलं. शेवटी पोलीस, महापालिका आयुक्त फौजफाटा घेवून तिथे पोहोचले आणि रिझवान बॅटरीवाला यांना बाहेर काढण्यात आलं. बाहेर आल्यानंतर रिझवान यांनी आयुक्तांना आपल्या मागणीचं निवेदन देत शहरातील गटारींवर झाकणं बसवण्याची विनंती केली. पण रिझवान यांच्या आंदोलनापेक्षी त्यांची कशी फसगत झाली याचीच चर्चा उपस्थितांमध्ये रंगलेली दिसली.