सोलापूर : सोलापुरात कोरोनाचे रुग्ण असल्याच्या चर्चा सकाळपासून सोशल मीडियात व्हायरल होत होत्या. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याची माहिती हॉस्पीटलकडून देण्यात आली आहे. सोलापुरातल्या आश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्रात एका रुग्णास कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत होती. यासाठी रुग्णाची एक रिपोर्ट देखील व्हायरल करण्यात येत होती.


ज्यामध्ये रुग्णास कोरोना व्हायरस निष्पण झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र या कोरोना व्हायरस आणि रिपोर्टबद्दल हॉस्पिटलकडून अधिकृत खुलासा करण्यात आलेला आहे. चीनमधून सुरुवात झालेल्या आणि जगभरात थैमान घातलेलं कोरोना व्हायरस म्हणजे N COVID-19 आणि या रुग्णामध्ये आढळलेलं कोरोना विषाणू हे भिन्न असून त्याचा जीवाला फारसा धोका नसल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतामध्ये आधी देखील कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले होते. ज्याची गंभीरता फार मोठी नव्हती. मात्र सध्या साथ सुरु असलेल्या कोरोना व्हायरसची तीव्रता ही जास्त आहे.


Majha Vishesh | कोरोनाला़ टाळून सांगा कसं जगायचं? माझा विशेष



सोलापुरातल्या रुग्णामध्ये भारतात आधी आढळत असलेल्या कोरोनाचे विषाणु होते. मात्र आताच्या कोरोनाची याचा संबंध नसून नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहन रुग्णालयामार्फत करण्यात आले आहे. सोलापुरातील आर्किटेक्ट असलेले 38 वर्षीय रुग्ण फिरण्यासाठी तिरुपतीला गेले होते. मात्र परतल्यापासून त्यांची प्रकृती खालावली होती. ताप, खोकला असल्याने त्यांना बुधवारी रात्री सोलापुरातल्या आश्विनी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी रुग्णास अॅडमिट करुन त्याची निमोनियाची तपासणी केली. रूग्णाच्या नमुन्यांची तपासणी बायोफायर फिल्मअरे न्युमोनिया पॅनल प्लस या मशीनवर तपासणी करण्यात आली होती. ही मशीन पुर्णत: स्वयंचलित असून यामध्ये विविध विषाणुंच्या तपासण्या एकाच वेळेस केले जातात. मशीनच्या पॅनलमध्ये भारतात आधीपासून असलेल्या कोरोनाचा देखील समावेश होता. त्यामुळे सदरील रुग्णाच्या तपासणीत त्याचे देखील टेस्ट झाले. मात्र सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना अर्थात N COVID 19 चा याच्याशी काहीही संबंध नसुन लोकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.



दरम्यान सोशल मीडियावर हॉस्पिटल खाली करण्यात येत असल्याच्या चर्चा देखील यावेळी पाहायला मिळाल्या. मात्र रुग्णालयातील दैनंदिन उपचार योग्य पद्धतीने सुरु असल्याचेही रुग्णांच्या नातेवाईकांनी माहिती दिली.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 30 वर, दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद