दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. विधान परिषदेच्या दोन जागांचा आज निकाल, मतदानाआधी नागपुरात झालेल्या राजकीय नाट्यामुळे निकालाकडे साऱ्यांचं लक्ष
नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत या दोन्ही जागांवर होणार आहे. या निवडणुकीत काही चमत्कार होणार की अपेक्षित निकाल लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विशेषत: नागपूरच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 


2. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टातील सुनावणी आज मंगळवारी दुपारी दोन वाजता होणार आहे. सोमवारी कामकाजाच्या यादीनुसार, वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्यानं आता मंगळवारी सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या याचिका कोर्ट एकत्रित ऐकणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले, OBC आरक्षणाच्या याचिकेवर आज दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. मध्यप्रदेशची केस देखील काहीशी आपल्या सारखीच आहे. त्यामुळे आज दुपारी 2 वाजता OBC प्रकरणावर सुनावणी होणार आहे. मध्य प्रदेशसाठी तुषार मेहता केस लढत आहेत. इतर राज्यामध्ये देखील आपल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आज निर्णय होणार आहे. 


3. म्हाडा भरतीची परीक्षा आता टीसीएसच्या मदतीने घेणार, गृहनिर्माणमंत्र्यांची घोषणा, पारदर्शकता राखणार असल्याची ग्वाही
म्हाडाच्या परीक्षा आता टीसीएसच्या मदतीनं घेण्यात येणार आहेत. म्हाडा परीक्षेबाबत आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.परीक्षा लवकरात लवकर घेण्यात येईल आणि त्यात पूर्ण पारदर्शकता राखली जाईल असं मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणालेयत


4. दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणं महाग पडणार, दोनशे रुपयांऐवजी थेट हजार रुपयांचा दंड, 11 डिसेंबरपासून नवे नियम लागू
वाहन चालकांनसाठी आता नवीन दंड नियमावली (Trafic Rules) लागू करण्यात येणार आहे. नव्या नियमावलीत दंडाच्या रक्कमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. नव्या केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार, वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तर चार चाकी वाहन मालकांना दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. एवढंच नाहीतर, तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच लायसन्स नसताना गाडी चालवणाऱ्यांना आधीचा दंड 500 रुपये होता. पण आता या दंडात वाढ होऊन आता तो 5 हजार रुपयांवर पोहोचला आहे. 


5. मुंबईत लसीकरणासाठी नाईट शिफ्ट, 100 टक्के व्हॅक्सिनेशनचं पालिकेचे लक्ष्य
कोरोना महासाथीला अटकाव करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी मुंबई महापालिकेने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईमध्ये सोमवारपासून संध्याकाळी पाच ते रात्री 11 वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत. रात्रीची लसीकरण केंद्रे ही रेल्वे स्थानक परिसरात असणार आहे. त्यामुळे कष्टकरी, सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्या ही लसीकरण केंद्रे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहेत. 


Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 14 डिसेंबर 2021 : मंगळवार : एबीपी माझा


 



6. 25 ते 31 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांचा दहावेळा विचार करावा, मुंबईच्या महापौरांचं पालिका आयुक्तांना आवाहन, हॉटेल चालकांनाही सज्जड दम
नव्या ओमायक्रॉन व्हेरियंट आणि थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने पालिका आयुक्तांना आवाहन केले आहे. 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांचा दहावेळा विचार करण्याचं आवाहन पालिकेने आयुक्तांना केले आहे. तसेच हॉटेल चालकांनाही सज्जड दम दिला आहे.


7. काश्मीर टायगर्सच्या नावाने पाकिस्तानची नवी चाल, श्रीनगरमध्ये ड्युटीवरुन परतणाऱ्या जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला, दोन शहीद तर 14 जखमी
जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये काश्मिर पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. या घटनेत 14 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या उपचार सुरू आहेत.  काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


8. ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला बळी, ब्रिटनमध्ये एका रुग्णाचा मृत्यू, जगासह भारताचं टेन्शन वाढलं
कोरोना महामारीने संपूर्ण जगाला मागील दोन वर्षांपासून विळखा घातला आहे. हा विळखा मागील काही महिन्यांत सैल होत आहे, असे वाटत असतानाच ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने जन्म घेतल्याने संपूर्ण जगाची चिंता पुन्हा वाढली आहे. दरम्यान नुकतीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युकेमध्ये ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण होऊन किमान एका रुग्णाचा जीव गेल्याची माहिती दिली आहे. या माहितीमुळे ओमायक्रॉन व्हेरियंटही जीवघेणा असल्याचे समोर आल्याने जगभरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.


9. करीना कपूर, अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं पालिकेची डोकेदुखी वाढली, पार्टीत अनेकांच्या संपर्कात आल्याने सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिले आहेत. करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन्ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्री ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत, त्या सर्वांचे आता कोरोना चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरवात केलीय. 


10. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेतून रोहित शर्माची माघार, पायाच्या दुखापतीमुळं हिटमॅनला विश्रांतीचा सल्ला, प्रियांक पांचाळला संधी
भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. हा दौरा 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. दरम्यान दौऱ्यासाठी भारतीय संघाने आपला संघ जाहीर केला होता. यावेळी रोहित शर्माला एकदिवसीय संघाचं कर्णधारपद तर कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून घोषित करण्यात आलं. पण आता दुखापतीमुळे रोहित कसोटी संघाबाहेर झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. दरम्यान रोहितच्या जागी युवा खेळाडू प्रियांक पांचाल याला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने याबाबत ट्वीट करत माहिती दिली.