बारामती : माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार किती हजरजबाबी आहे याचे किस्से आपण कायमच ऐकत आलो आहोत. पवार प्रत्येक वयातील प्रत्येकासोबत किती सहजतेने संवाद साधतात हे बारामतीत पाहायला मिळाले आहे.

बारामतीच्या गदिमा सभागृहात शारदोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी एका बालगायिकेने शरद पवार यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. गायिका असलेल्या या छोट्याशा चिमुरडीला पवारांनी होकार दिला. आता ही चिमुरडी पवारांना काय प्रश्न विचारणार व त्यावर पवार काय उत्तर देणार याकडे सर्व उपस्थितांचे लक्ष होते. तिने पहिला प्रश्न केला,  मला कविता करता येतात पण तुम्ही इतकी छान भाषणं कशी काय देता हो? पवार हसत हसत म्हणाले, मी भाषण देऊ शकतो पण कविता काही करु शकत नाही, इथं तुझी आणि माझी परिस्थिती सारखीच आहे, या उत्तरावर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

चिमुरडीने दुसरा प्रश्न केला. मी जेव्हा पावसात भिजायला जाते, तेव्हा माझे आजोबा मला खूप रागावतात पण तुम्ही इतक्या जोरदार पावसात कसं काय भाषण दिलं. पवार हसून तिला म्हणतात...तुझे आजोबा तुला रागावत असले तरी मी पावसात भिजून भाषण केल्याने माझ्या मतदारांनी मला जास्त मते दिली. या उत्तरावर जोरदार टाळ्या मिळाल्या.



शरद पवारांची साताऱ्यातील सभा
पायाला होणाऱ्या असह्य वेदना आणि अशा अवस्थेत 79 वर्षांच्या शरद पवारांनी 18 ऑक्टोबरला साताऱ्यात भरपावसात सभा घेतली होती. ही सभा साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी टर्निंग पॉईंट ठरली. भर पावसात भाषण करणाऱ्या शरद पवारांची दृश्ये प्रेरणादायी ठरली. व्हॉट्सअप, ट्विटर आणि फेसबुकवर केवळ पवारांच्या भर पावसातील भाषणाची चर्चा होती. या सभेत राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपवासी झालेल्या उदयनराजेंवर त्यांनी निशाणा साधला होती. लोकसभेत उदयनराजेंना उमेदवारी देऊन चूक केली, अशी कबुली शरद पवारांनी दिली होती. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी 87,717 मतांनी उदयनराजेंचा पराभव केला.