अमरावती : बडनेराचे आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष दिनेश बुब यांच्यात वाद झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बडनेरापासून काही अंतरावर असलेल्या मधूबन वृद्धाश्रमात हा प्रकार घडला आहे. रवी राणा आणि दिनेश बुब याठिकाणी दिवाळीनिमित्त वृद्धांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आले होते.

Continues below advertisement


वृद्धाश्रमात छोटेखाणी कार्यक्रम आमदार रवी राणा यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता. आमदार राणा तिथे पोहचल्यावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश बुब यांचाही तिथेच कार्यक्रम सुरु होता. आमदार रवी राणा आणि दिनेश बुब यांच्या काही कारणावरुन बाचाबाची झाली आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. या सर्व प्रकाराचा व्हिडीओही समोर आला आहे.



शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांनी खासदार नवनीत राणा यांना शिवीगाळ केल्यामुळे आणि स्त्रीचा अपमान केल्याने हा वाद झाल्याचं आमदार रवी राणा यांनी सांगितलं. तर आमची ही संस्कृती नसून आमदार राणांनी ज्या ठिकाणी वाद घातला ते ठिकाण योग्य नसून त्याला त्याच ठिकाणी मी उत्तर दिलं असल्याचं दिनेश बुब यांनी सांगितले. ऐन दिवाळीच्या दिवशी या हाणामारीने जिल्ह्यात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं असून अद्याप कोणीच पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही.