मुंबई : शिवस्मारकाच्या भूमीपूजनानंतर मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांसारख्या दिग्गजांची भाषणं झाली. यावेळी समोर बसलेले शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणा देत होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे भाषणाला उभे राहिले, त्यावेळी कार्यक्रमात उपस्थित शिवसैनिकांनी ‘आवाज कुणाचा.....शिवसेनेचा’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. शिवसैनिकांच्या घोषणा वाढत जात असल्याचे लक्षात आल्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी खुर्चीवरुन उठून उपस्थित शिवसैनिकांना शांततेचं आवाहन केलं. त्यानंतर शिवसैनिकांच्या घोषणा काही प्रमाणात थंडावल्या आणि चंद्रकांतदादा पाटलांनी आपलं भाषण पुन्हा सुरु केलं.
त्यानंतर ज्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले, त्यावेळी शिवसैनिकांनी पुन्हा घोषणा सुरु केल्या. ‘कोण आला रे..कोण आला.... शिवसेनेचा वाघ आला’ असे जोरजोराने घोषणा देत शिवसैनिकांनी कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं स्वागत केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी बोलायला सुरुवात केल्यानंतर शिवसैनिक शांत झाले.
शिवसैनिक शांत झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपलं भाषण सुरु केलं. मात्र, त्यावेळी भाजप कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाले आणि जोरजोरात ‘मोदी..मोदी...मोदी’च्या घोषणा सुरु केल्या. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते यांच्यमध्ये काहीसं घोषणायुद्ध पाहायलं मिळालं.