लातूर : स्कूल व्हॅनच्या धडकेत सहा वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लातूरमधील आयडियल इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी गायत्री हंगे घरी जाताना हा अपघात घडला. गायत्रीच्या अकाली मृत्यूमुळे हंगे कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.


लातूरच्या किणगावमध्ये राहणारी गायत्री शाळा सुटल्यानंतर काल संध्याकाळी आपल्या घरासमोर व्हॅनमधून उतरली. गायत्री कोणत्या बाजूने घराकडे जात आहे, हे वाहनचालकाच्या लक्षात आलं नाही. त्यावेळी गाडी पुढे घेताना गायत्रीला जोरदार धडक बसली.

गंभीर जखमी अवस्थेत गायत्रीला लातूरच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा गायत्रीचा मृत्यू झाला. सकाळी पोस्टमार्टम करण्यात आलं असून दुपारनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

अतिशय हसमुख आणि सुंदर असलेल्या गायत्रीच्या अचानक जाण्याने गायत्रीच्या आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. दहा दिवसापासून गायत्री शाळेत जायला लागली होती. यासंबंधी पोलिस कायदेशीर कारवाई करत आहेत