नागपूर : हरतालिकेच्या पुजेनिमित्त गेलेल्या सहा महिलांचा एका नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे. नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील देवळी-सावगी गावात सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

 

मंदाताई नागोसे (वय 45 वर्ष), प्रिया रामप्रसाद राऊत (वय 17 वर्ष), जान्हवी ईश्वर चौधरी (वय 13वर्ष), पूजा रतन ददमाल (वय 17 वर्ष), पूनम तुलसीराम ददमाल (वय 18 वर्ष), प्रणाली भगवान राऊत (वय 16 वर्ष) अशी मृतांची नावं आहे.

 

हरतालिका पुजेनिमित्तच्या स्नानसाठी या महिला गावातील नाल्यात गेल्या होत्या. बोरगाव धरणातून या गावाला पाणी पुरवठा होता. पाणी सोडल्याने नाल्यातील पाणी वाढलं. परंतु या नाल्याशेजारी पूल बांधण्यासाठी जो खड्डा खणला होता, त्यात पाणी भरलं. अंदाज न आल्याने महिला पाण्यात बुडल्या. सुरुवातीला सर्व महिला नाल्यात वाहून गेल्याच अंदाज वर्तवला जात होतं. मात्र त्यापैकी एक मृतदेह खड्ड्यातील पाण्यात तरंगू लागल्याने तिथून सगळे मृतदेह बाहेर काढले.

 

या दुर्दैवी घटनेनंतर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देवळी-सावगी गावात दाखल झाले. तसंच या प्रकरणाचा तपास करुन बुधवार संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.