मुंबई : राज्यभर लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर अखेर आज गणरायाला निरोप देण्यात येत आहे. राज्यभर उत्साहाचे वातावरण आहे. मात्र काही ठिकाणी विसर्जनादरम्यान भाविकांच्या बुडून झालेल्या मृत्यूमुळे या उत्साहाला गालबोट लागलं आहे. राज्यात विविध ठिकाणी विसर्जनादरम्यान एकूण 12 जणांना मृत्य झाला आहे, तर दोघेजण जखमी आहेत.
जालना
जालन्यात गणपती विसर्जनावेळी तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. शहरातील मोती तलावात विसर्जनावेळी दोन घटनांत तिघांचा एकाच तलावात बुडून मृत्यू झाला. निहाल चौधरी, शेखर भदनेकर, अमोल रणमुळे अशी मृत मुलांची नावं आहेत. विसर्जनावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
भंडारा
भंडाऱ्यात पवनी तालुक्यातील सिंगोरी गावातील दोन मुलांचा मामा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. वैभव आडे आणि संकेत कनाके अशी मृत मुलांची नावे आहेत. गणपती विसर्जनानंतर हे दोघे मामा तलावात पोहोण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला.
बुलडाणा
बुलडाण्यात मेहकर तालुक्यातील शेलगाव येथे धरणात बुडूत दोघांचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जखमी झाले आहेत. महादेव ताकतोडे आणि पुरुषोत्तम सोळाके अशी मृत्यांची नावं आहेत. गणपती विसर्जन करताना ट्रॅक्टरमधून गणपती बाहेर काढून धरणात विसर्जन करताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बुडाले.
अमरावती
अमरावतीत वरुड तालुक्यातील रोषनखेडा येथील राहुल नेरकर याचा विसर्जनावेळी सुरळी फत्तेपूर रोडवरील खदानमध्ये बुडून मृत्यू झाला. तर साताऱ्याच्या माहूली गावाजवळ कृष्णा नदी पात्रात दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
शिर्डी, सोलापूर
शिर्डीत संगमनेर शहरात प्रवरा नदीच्या पात्रात गणपती विसर्जनासाठी गेलेल दोघे वाहून गेले. एकाला वाचविण्यात यश तर नीरज जाधव याचा शोध सुरू आहे. सोलापूरमध्येही एकाचा विसर्जनदरम्यान बुडून मृत्यू झाला आहे.