Winter Assembly Session Maharashtra : हिवाळी अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनं घेण्याबाबत प्रक्रिया पार पडणार आहे. काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. त्याला भाजपनं आक्षेप घेतला होता. नियम समिती या प्रस्तावाचं अवलोकन करून आवाजी मतदानानं अध्यक्ष निवड करण्याबाबतच्या निर्णयाची प्रक्रिया पार पाडेल. दरम्यान, अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं काँग्रेस नेत्यांकडून सांगितलं जात होतं. भोरचे आमदार संग्राम थोपटेंचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या मतदानानं व्हावी यासाठी नियमात बदल करण्यात आला होता. 


आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही आवाजी मतदान पद्धतीनं घेण्याबाबतची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधासनभा अध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाऐवजी आवाजी पद्धतीने घेण्यात यावी, अशा स्वरुपाचा प्रस्ताव मांडला होता. आज नियम समिती या प्रस्तावाचं अवलोकन करून आवाजी मदतानाने अध्यक्षपद निवड करण्याबाबतच्या निर्णयाची प्रक्रीया पार पाडेल. याकरता सूचना आणि हरकतींचा विचार करुन दुपारपर्यंत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीबाबतचा निर्णय जाहिर केला जाईल.


महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदमध्ये अध्यक्ष निवडीबाबत गुप्त मतदानाची पद्धत आहे. हाच नियम महाराष्ट्रात बदलण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसकडून येत्या सोमवारी अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरला जाईल असे सांगण्यात येत आहे.


कोणती नावं चर्चेत?


विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील. त्यामुळे काँग्रेसमधून या पदासाठी संग्राम थोपटे आणि के. सी. पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेनेकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह असल्याचं समजत आहे.




संग्राम थोपटे : गेल्या दोन वेळा संग्राम थोपटेंची अध्यक्षपदाची संधी हुकली होती. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ थोपटेंच्याच गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 


पृथ्वीराज चव्हाण : हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. अनुभवी आहेत. तसेच सभागृहाच्या कामाकाजावर पृथ्वीराज चव्हाणांची चांगली पकड देखील राहील, असा पक्षश्रेष्ठींचं म्हणणं आहे. त्यामुळे या स्पर्धेत पृथ्वीराज चव्हाणांचं नावही आघाडीवर आहे. 
 
 के. सी. पाडवी : काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अशी व्यक्ती अध्यक्ष पदासाठी योग्य ठरेल, असंही महाविकास आघाडीला वाटत आहे. 


दरम्यान,  हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आणि आज ठाकरे सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती तयार आहे. नोकरभरती, वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षेत झालेले घोळ यावरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्याची विरोधकांची रणनिती असणार आहे. काल भाजप आमदारांनी आयोजित केलेल्या भोजनावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन केल्याचं कळतंय. दरम्यान परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे गेल्या सरकारशी जोडले गेले आहेत, हे पुराव्यानिशी सादर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळं आज परीक्षा घोटाळ्यांवरुन सरकारची परीक्षा असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Winter Assembly Session Maharashtra : आज अधिवेशनचा दुसरा दिवस; पेपरफुटी, नोकरभरतीवरुन सरकारवर हल्लाबोल करण्याची विरोधकांची रणनिती


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह