Majha Katta With Satyasheel Deshpande : शास्त्रीय संगीतविश्वातील ख्यातनाम गायक पंडित सत्यशील देशपांडे यांच्या गान गुणगान नव्या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशित झालं. या निमित्तानं त्यांना आज बोलतं करण्यात आलं.  संगीतातील घराणी आणि त्यांची वैशिष्ट, दिग्गज कलावंतांचे खुमासदार किस्से या पुस्तकातून सांगितले आहेत. अभिजात संगीत अगदी सोप्या शब्दात या पुस्तकातून मांडल्याचं त्यांनी सांगितलं. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गायक पंडित सत्यशील देशपांडे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांचे संगितातील अनुभव पुस्तकरूपात कसे आले याबाबत सांगितलं. 


"एक माध्यम दुसऱ्या माध्यमातून सांगता येत नाही. एखादं चित्र पाहिल्यानंतर काय वाटतं हे वेगवेगळ्या फुलांचा सुगंध घेऊन सांगता येत नाही. त्यामुळे स्वर काय सांगतात हे चित्र काढून सांगता येत नाही. याच संकल्पनेतून पुस्तक लिहिलं. सोप्या भाषेतून संगीत कळावं यासाठी देखील हे पुस्तक लिहिलं. शिवाय ते सर्वांना समजावं म्हणून त्याच्यात क्यूआर कोड दिले आहेत. हा कोड स्कॅन करून प्रत्यक्षात ते संगीत अनुभवता येतं, असं गायक सत्यशील देशपांडे यांनी यावेळी सांगितलं.   


गायक पंडित सत्यशील देशपांडे यांनी यावेळी शास्त्रीय संगीतातील घराणी कशी जन्मली याबाबत सांगितलं. "त्यावेळच्या काळी संपर्क माध्यमांचा अभाव होता. लोक एकमेकांचं ऐकत नव्हते. गुरू आपल्या शिष्याला दुसऱ्या घराण्याचं गाणं ऐकू देत नसत. दुसऱ्या घराण्याचं संगीत देखील एकमेकांना मान्य नसायचं. यातूनच संगीत घराण्यांची निर्मिती झाली असं त्यांनी यावेळी सांगितलं.  


साहित्याची खूप आवड होती. परंतु, मी संगीत क्षेत्रात आलो. आपल्या आवडत्या क्षेत्रात आल्याने जीवनातील आभासीपणा कमी होतो. हाच आभासीपणा कमी होण्यासाठी मी या क्षेत्रात आलो असे सत्यशील देशपांडे यांनी यावेळी सांगितले.