सिंधुदुर्ग: नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही. मुंबईत मराठी माणसाला कोणी न्याय दिला, मराठी माणसाला कोणी टिकवलं हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राची अस्मिता ज्यांनी टिकवली त्यांना ठाकरे म्हणतात. त्यांची तुलना राणेंशी होऊ शकत नाही अशी खोचक प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी दिली. एक जागा निवडून येणाऱ्या माणसाची ठाकरेशी तुलना करणं चुकीचं आहे असंही ते म्हणाले.


जेव्हा तुम्ही बंदुका घेऊन फिरत होता, खंडणी गोळा करत होता, अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत होतात तेव्हा तुमचा आणि आमचा वाद होता का? त्यामुळे तुमच्यावर कारवाई केली असा सवालही शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विचारला. नारायण राणेंच्या माणसांनी श्रीधर नाईक यांची हत्या केली तेव्हा त्यांचा आणि आमचा वाद होता का असाही सवाल यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित केला. सत्यविजय भिसे यांची दिवसाढवळ्या हत्या झाली. हे सर्व घडत असताना तुमची आणि ठाकरेंची तुलना होऊ शकत नाही. बाळासाहेबांमुळे तुम्हाला योगायोगाने एक पद मिळालं, त्याला सुद्धा ही लोकं विसरले असा टोलाही त्यांनी लगावला. 


आमदार दीपक केसरकर म्हणाले की, "राज्यात आमची सत्ता आहे, तरी देखील आम्ही कायदा हातात न घेता राणेंना सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. जर आम्ही सत्तेचा वापर केला असता तर नितेश राणेंची हॉस्पिटलमध्ये नव्हे तर जेलमध्ये रवानगी केली असती. यावरुनच इथे सत्तेचा वापर केला जातो की नाही समजतं."


आमदार दीपक केसरकर पुढे म्हणाले की, "राजकीय वादातून तुम्हाला या प्रकरणात गुंतवलं असतं तर हॉस्पिटलमध्ये तुमची पुन्हा चौकशी केली असती. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे एखादा राजकीय नेता वळतो तेव्हा त्याच्यावर यासाठीच शिक्षा करावी लागते की तो पुन्हा असे कृत्य करणार नाही. यासाठी त्याला शिक्षा केली जाते." 


महत्त्वाच्या बातम्या: