सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे कृषी अधिकाऱ्यांना धमकावतानाचा हा व्हिडीओ सध्या सिंधुदुर्गात प्रचंड व्हायरल झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे अमिताभ बच्चन आहे का, त्याला बघायला जाताय? असं म्हणत उदय सामंत यांच्या दौऱ्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना नितेश राणेंनी झापलं. तसेच तासाभरात देवगड लिंगडाळ गावात न आल्यास मिरवणूक काढण्याची धमकीही त्यांनी फोनवरुन कृषी अधिकाऱ्याला दिली.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भातशेती नुकसानीच्या भागात जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्ह्यातील कृषी विभागातील अधिकारी पालकमंत्र्याच्या दौऱ्यावर तसेच आढावा बैठकीच्या कामात व्यस्त होते. दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे देवगड तालुक्यातील लिंगडाळ गावात शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करण्यासाठी गेले होते. परंतु या दौऱ्यात तलाठी, कृषी अधिकारी न आल्याने नितेश राणे यांनी फोन करुन अधिकाऱ्यांना झापलं.
पंचनामे झाले का याबाबत शेतकऱ्यांना विचारणा केल्यावर प्रत्यक्षात कृषी विभागाचे अधिकारी बांधावर पोहोचले नाही, असं समजल्यानंतर नितेश राणे संतप्त झाले. यानंतर त्यांनी कृषी अधिकाऱ्याला फोनवरुन झापलं. तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री अमिताभ बच्चन आहे का? अशीही विचारणा केली. तसंच लिंगडाळ गावात शेतकऱ्यांच्या बांधावर तासात न आल्यास मिरवणूक काढतो अशी धमकीही नितेश राणे यांनी दिली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुम्ही पंचनामे करायला इथे पोहोचले नाहीत, तुम्हाला हजामत करायला ठेवलं आहे का? कसले पंचनामे सुरु आहेत? मी इथे लिंगडाळ गावामध्ये आहे. इथे तुमचा एक अधिकारी पोहोचलेला नाही. पुढच्या एक तासामध्ये पोहोचला नाही तर मी तिथे येतो घ्यायला. एक तासामध्ये इथे लिंगडाळला ये आणि मला फोन कर. तू इथे आला नाहीस ना, मग आणतो बघ तुझी मिरवणूक कशी इथपर्यंत. उठ तिथून पहिला आणि लिंगडाळला ये," असं नितेश राणे फोनवर बोलत असल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये ऐकायला/पाहायला येत आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंदाजे सहा हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेतीचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील एकूण लागवडीच्या 25 ते 30 टक्के भातशेतीचे नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.