पुणे : पुण्यात नववर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2019 पासून हेल्मेट सक्ती होणार आहे. शहरातील वाढत्या अपघातांमुळे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी घेतला आहे.


याआधी पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरु केल्यावर विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी एकत्रित कृती समिती स्थापन करुन हेल्मेट सक्तीला विरोध केला होता.

संपूर्ण देशभरात सुमारे 35 हजार जणांचा मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाल्याची धक्कादायक आकडेवारी काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन पुण्यात हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात सध्या जवळपास 27 लाख दुचाकी असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे. वाहनांची गर्दी आणि अरुंद रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे शहरात हेल्मेट सक्ती गरजेची असल्याचं मत व्यक्त होत आहे.

सुरुवातीला जनजागृती करुन मग हेल्मेट सक्ती करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. त्यामुळे आता दीड महिनाआधी ते पुणेकरांची मानसिक तयारी करत असल्याचं दिसतं. आता पुणेकर आयुक्तांच्या या निर्णयाला कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल.