नागपूर : श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. आपल्या हॉटेलमधून काढून टाकलेल्या तरुणाला पुन्हा नोकरी देणाऱ्यास श्रीराम सेनेच्या गुंडांनी बेदम मारहाण केली आहे. धक्कादायक म्हणजे हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात घडलं आहे.


 

एखाद्या जनावराप्रमाणं श्रीराम सेनेच्या गुंडांनी हर्षदला बडवलं. त्याचा दोष इतकाच होता की, श्रीराम सेनेच्या तुषार घागरेनं ज्या कुकला त्याच्या हॉटेलातून काढून टाकलं, त्याला हर्षदनं नोकरी दिली.

 

हर्षद आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण होत असताना गस्तीवरचं पोलीस पथक पोहोचलं. त्यानंतर श्रीराम सेनेचा उपाध्यक्ष तुषार घागरे आणि त्याचे साथीदार फरार झाले. त्यांना शोधून जेरबंद करण्याऐवजी पोलिसांनी चक्क प्रकरण मिटवून घेण्याचा सल्ला दिला.

 

हर्षद आणि त्याच्या भावानं अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर सूत्रं हलली आणि तुषार घागरेसह 15  जणांवर दंगल घडवल्याचा गुन्हा दाखल झाला.

 

काही दिवसांपूर्वीच श्रीराम सेनेच्या अध्यक्षावर प्लॉट बळकावल्यामुळं गुन्हा दाखल झाला. आता उपाध्यक्षानं दहशत निर्माण करुन पुढचं पाऊल टाकलं आहे. त्यामुळं किमान घरात तरी शांतता राहावी यासाठी फडणवीसांनी अशा टोळ्यांचा बंदोबस्त तातडीनं करावा म्हणजे मिळवलं.