नवी दिल्ली : अनाथ मुलांसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ आणि भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला आपटे यांना नारीशक्ती राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

दरवर्षी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयाच्या वतीनं देशभरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. यंदाच्या यादीत महाराष्ट्रातल्या या दोन महिलांचा समावेश आहे.

सिंधुताई सपकाळ यांनी अतिशय खडतर परिस्थितीत आयुष्य व्यतीत करुन शेकडो अनाथ मुलांना आईच्या मायेचं छत्र दिलं. त्यांना याआधीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. सिंधुताईंचा जन्म वर्धा जिल्ह्यातल्या नवरगाव इथला आहे.

उर्मिला बळवंत आपटे या मुंबईतील भारतीय स्त्री शक्ती या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा आहेत. भारतीय स्त्री शक्ती ही संस्था महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, मानसिक आणि शारिरीक आरोग्य, स्वाभिमान, आर्थिक स्वातंत्र्य तसेच लिंग समानता या या पंचसुत्रीवर काम करते. गेल्या 30 वर्षांपासून भारतीय स्त्री शक्ती जे काम करतंय, त्याचाच सन्मान या पुरस्काराच्या रुपानं झाल्याची भावना यावेळी उर्मिला आपटे यांनी व्यक्त केली.

केंद्रीय कॅबिनेटनं ज्या सरोगसीसंदर्भातल्या विधेयकाला मंजुरी दिली, त्यात भारतीय स्त्री शक्तीनं केलेल्या महत्वाच्या सूचनांचा समावेश असल्याचं समाधान आहे, भविष्यातही महिलांच्या प्रश्नांवर आपण काम करत राहू असं आपटे यांनी म्हटलं आहे.