पुणे  :  शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी अद्यापही काही काळ दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे रविवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी खबरदारी म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र तसेच तिन्ही कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
     
पवार म्हणाले, रविवारी गणेश विसर्जनाचे दिवशी अत्यावश्यक सेवा, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुरू ठेवण्यात येतील. विसर्जनाच्यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात यावे. अधिक गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी देखील कोरोना विषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करून  प्रशासनाला सहकार्य करावे, असे आहवान त्यांनी केले.



नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात यावे  आणि त्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. दुसरा डोस घेतलेल्या जलतरण खेळाडूंना जलतरण तलावात सरावासाठी अनुमती देण्यात येईल. गणेश उत्सवानंतर  परिस्थितीचा आढावा घेवून आवश्यक निर्णय घेण्यात येतील, असेही पवार म्हणाले.


जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा 92 लाखाचा टप्पा पार करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात 18 लाख 80 हजार लसमात्रा देण्यात आल्या होत्या, तर सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 11 लाख 20 हजार लस देण्यात आल्या आहेत. मागील दोन आठवड्यात 5 वेळेस पुणे जिल्ह्याने 1 लाखापेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण केले आहे. या आठवड्यात दंडात्मक कारवाईद्वारे 20 लाख 95 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मागील आठवडयात पुणे जिल्हयाचा बाधित रुग्णसंख्येचा दर 3.9 टक्के होता. पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रात धडक मोहिम अंतर्गत एकूण 4 लाख 30 हजार नमुना तपासणी पूर्ण केली आहे. गेल्या आठवड्यात मृत्यूदर कमी होऊन 0.9 टक्क्यापर्यंत आला असल्याचे त्यांनी सांगितले.