जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरु झाली आहेत. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर ठिय्या मांडला होता.
मराठा समाजाच्या वतीने परतूर, मंठा जाफराबाद येथे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी परळी आंदोलनाला पाठिंबा म्हणून बदनापूर येथे देखील आंदोलन केलं. या आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी आज सकाळपासून पाण्याच्या टाकीवर ठिय्या मांडला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, तसेच न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत सरकारने नोकरभरती थांबवावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
दरम्यान, सरकार जोपर्यंत यावर लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.