बीड : देशासह राज्यातही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूदरातही वाढ होत आहे. अशातच वाढत्या रुग्णसंख्येमुळं आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. तसेच अनेक ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करुन कारवाई केल्याचंही आपण ऐकलं आहे. अशातच आता बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  


बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार सुरु असल्याचं समोर आलं आहे. मागील आठवड्यात शिवाजीनगर पोलिसांनी तीन आरोपींना अवैध्यरित्या रेमडेसिवीर इंजेक्शन विकताना पकडल होतं. आता यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सलाईनचे पाणी टाकून ते रुग्णांना विकलं जात होतं. हा प्रकार समोर आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 


राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. परिणामी या रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्रास काळा बाजार सुरु असल्याचं समोर आलं आहे. असं असताना तुम्ही घेतलेलं इंजेक्शन हे बनावट तर नाही ना? हे नक्की तपासून पहा. कारण बीडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावाखाली एका व्यक्तीला बनावट इंजेक्शन देण्यात आलं. याच दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर विकून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे, यातील एक आरोपी कंपाउंडर असून त्याने रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सलाईनचे पाणी टाकून एक इंजेक्शन 22 हजारांना विकण्याचा प्रयत्न केला आहे.




दरम्यान, काळ्याबाजारात एका रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत जवळपास 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत आहे. मात्र हे इंजेक्शन मिळवण्यासाठी देखील रुग्णांच्या नातेवाईकांना मोठे प्रयत्न करावे लागतात. एकीकडे जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिवीरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना नोंदणी करण्याचं आवाहन केलं जातंय. परंतु नोंदणी केल्यानंतर जवळपास सहा दिवसानंतर देखील इंजेक्शन हाती मिळत नाही. त्यामुळेच काळाबाजारातून इंजेक्शन विकत घेण्याची वेळ नातेवाईकांवर येते. परंतु या प्रकारानंतर काळ्या बाजारातील इंजेक्शन देखील बनावट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :