वर्धा : कोरोनामुळं जवळपास वर्षभर मुलांच्या शाळा बंद राहिल्यानंतर आता हळूहळू सुरु करण्यात येत आहेत. असं असताना आता पुन्हा कोरोनाचे आकडे राज्यात वाढताना दिसत आहेत. यातच आता पालकांची चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील निवासी शाळेतील 75 विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी 30 आणि गुरुवारी 45 विद्यार्थ्यांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली. शाळेतील एकूण 247 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. 1 विद्यार्थी व 9 कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल प्रतीक्षेत आहे. तर 30 कर्मचाऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. विद्यार्थ्यांना याच शाळेच्या वसतिगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यातील काहींना सौम्य लक्षण होती तर काहींना लक्षण देखील नव्हती.


दोन टप्प्यात सुरु झाल्या शाळा
राज्यात शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून कोरोनाच्या नियमावलीसह सुरु केल्या आणि यामध्ये सुदैवाने कोणताही वाईट अनुभव न आल्याने 22 हजार 204 शाळेत सध्या 22 लाख विद्यार्थी उपस्थित राहत असल्याची माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यात 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले. पाचवी ते आठवीमध्ये 1 लाख 6 हजार 491 शाळेत 78 लाख 47 हजार विद्यार्थी शिकत आहेत. सध्या प्रत्येक बाकावर झिगझॅग पद्धतीने मुलांना बसविण्याचे नियोजन केले असल्याची माहिती आहे. सर्व शाळांची सफाई व निर्जंतुकीकरणाची मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती. यानंतर राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचण्याही जवळपास पूर्ण करण्यात आल्या असून शाळेत विद्यार्थी येण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी झालेली आहे. या मुलांना शास्त्र , गणित व इंग्रजी या तीन विषयाचे शिक्षण सुरु केले असल्याने विद्यार्थ्यांना मोजकेच दप्तर, नाकाला मास्क आणि स्वतःची पाण्याची बाटली घरून घेऊन यावं लागत आहे.


पाचवी ते आठवीपर्यंतचा टप्पा यशस्वी झाल्यानंतर चौथी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार करू : वर्षा गायकवाड


राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय
राज्यात कोरोनाबाधितांचा हळूहळू वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तीन हजारांच्या वर कोरोनाबाधित रोज समोर येत आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या माहितीनुसार काल 3297 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर 6107 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी देखील तीन हजारांच्यावर कोरोनाबाधित झाले होते. त्याआधी हा आकडा तीन हजारांच्या खाली होता. आतापर्यंत एकूण 1,97,00,532 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 30265 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.84% झाले आहे.