सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतीपैकी 69 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुका आज पार पडल्या. जिल्ह्यात 15 जानेवारीला ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 69 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुका आज पार पडल्या. सर्व सरपंचपदाच्या निवडणुका एकाच दिवशी होत आहेत. जिल्ह्यात 69 ग्रामपंचायतीपैकी 44 ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच तर 23 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचे सरपंच विराजमान झाले. दोडामार्गमध्ये आयनोडे हेवाळे ग्रामपंचायत ग्रामविकास ​पॅनलकडे गेली. तर देवगडमध्ये मोंड ग्रामपंचायतीवर शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीचा सरपंच विराजमान झाला.


सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे भाजपकडे होती. मात्र शिवसेनेने भाजपला धक्का दिला असून भाजपचे तात्या वेंगुर्लेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे इन्सुली ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या होत्या. तर अपक्ष म्हणून स्वागत नाटेकर निवडून आले होते. त्यामुळे इन्सुली ग्रामपंचायतीवर कोणाचे वर्चस्व येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र अखेर आज शिवसेनेने आपलं वर्चस्व राखलं.


दोडामार्ग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायती शिवसेनेकडे तर आयनोडे हेवाळे ग्रामपंचायत ग्रामविकास ​पॅनलकडे गेली आहे.​ तीनही ठिकाणी महिला सरपंच बनल्या आहेत.


सावंतवाडी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. तर तीन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.


वेंगुर्ले तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींपैकी आरवली ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा तर सागरतीर्थ ग्रामपंचायत शिवसेनेकडे गेली आहे.


कुडाळ तालुक्यातील 9 पैकी 5 ग्रामपंचायतींनवर शिवसेनेचे तर 4 ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच विराजमान झाले.


मालवण तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीपैकी पाच ग्रामपंचायतींवर भाजपचं वर्चस्व पाहिलं, तर शिवसेनेला एक ग्रामपंचायत राखता आली. मालवणमध्ये शिवसेनेला भाजपने मोठा धक्का दिला आहे.


कणकवली तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेचे सरपंच बनले तर एक ग्रामपंचायत भाजपकडे पाहिली.


वैभववाडी तालुक्यातील 13 पैकी 10 ग्रामपंचायतींवर भाजप तर 3 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा सरपंच विराजमान झाला असून भाजपने तालुक्यात आपलं वर्चस्व राखलं.


देवगड तालुक्यातील 23 पैकी 22 ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक शांततेत पार पडली. शिरगाव ग्रामपंचायत सरपंचपद आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात रीट पिटीशीयन दाखल केल्याने तेथील निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील 22 पैकी 15 ग्रामपंचायतींवर भाजप, 6 ग्रामपंचायतींवर शिवसेन तर मोंड ग्रामपंचायतीवर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे सरपंच विराजमान झाला.