मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय. राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी वडेट्टीवारांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. अशात आता केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे (Shobha Karandlaje) यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी वडेट्टीवारांवर कडक कारवाई करा अशी विनंती करंदलाजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी देशविरोधी आणि दहशतवाद्यांना समर्थन मिळेल असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी फडणवीसांकडे केली आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?
पहलगाम हल्ल्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केलं. दहशतवाद्यांना कोणताही जात-धर्म नसतो, धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? असं वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून टीकेची झोड उडाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. दहशतवाद्यांना कोणताही जात-धर्म नसतो. या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर त्वरीत कारवाई करावी. या प्रकारास इतर कोणताही रंग देऊ नये, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा आणि देशविरोधी मानसिकतेचा कळस असल्याटी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. काँग्रेसमध्ये तुष्टीकरण खोलवर रुजलंय, त्यामुळे हिंदूंवर होणाऱ्या निर्दयी हल्ल्यांमध्येही त्यांचे नेते राजकीय संधी शोधतात अशी टीका भाजप नेते विनोद तावडे यांनी केली.
काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 पर्यंटकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा सहभाग आहे.