हिंगोली : विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार करण्याची किंवा शासनाची दिशाभुल करण्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मात्र गोरगरीबांना देण्यात येणाऱ्या योजनांवरही शक्कल लढवून डल्ला मारणारे खादाडखाऊ समाजात असतात. गोरगरीबांना अल्प दरात जेवण मिळावे यासाठी सरकारने शिवभोजन केंद्र सुरु केले. मात्र काही शिवभोजन केंद्र चालक सरकारची दिशाभूल करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील शिवभोजन केंद्र चालकाने गुगली, व्हॉट्सअॅप भाई, एमंडी, सॉरी अशा प्रकारचे भलतेच लाभार्थी दाखवले आहेत. त्यामुळे या केंद्रचालकाला नोटीस बजावण्यात आली आहे.
12 ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग हे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे आहे. याठिकाणी देशभरात भक्त येत असतात कुणी कसे कुणी कसे भक्त येतात. त्यामुळे त्यांना 10 रुपयांत जेवणाची सोय औंढा येथील शिवभोजन केंद्रात होती. मात्र व्यंकटेश शिवभोजन केंद्रचालकाने खऱ्या लाभार्थ्यांना बाजूला ठेवत मनात येईल ती नाव शिवभोजन अॅपमध्ये भरली. ज्यात गुगली, व्हॉट्सअॅप भाई, एमंडी, सॉरी, कंडोम, रेबॅक, सिर्फ, मरियन,KYON अशा प्रकारच्या लाभार्थ्यांची नावंही शिवभोजन अॅप मध्ये भरली आहेत.
ना लाभार्थ्यांचे नाव, ना मोबाईल नंबर, ना लाभार्थ्यांचे फोटो अपलोड केलेत. महत्वाचे म्हणजे हे शिवभोजन केंद्र हे एका शटरमध्ये चालू असल्याचे सुरुवातीला दाखवण्यात आले. परंतु ते घरूनच चालत असल्याचेही समोर आले आहे. हा सर्व प्रकार या केंद्र चालकाने मार्च महिन्यात केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी शिवभोजन केंद्र चालवण्यात हलगर्जीपणा केल्यामुळे देयक कपात का करण्यात येऊ नये? शिवभोजन केंद्र रद्द का करण्यात येऊ नये? अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 24 तासात त्याचे उत्तर सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
खेडेकर यांनी चौकशीसाठी घेतला पुढाकार
हिंगोली जिल्ह्यात एकुण 9 शिवभोजन केंद्र मंजुर करण्यात आलेले आहेत. परंतु मागच्या अनेक दिवसांपासून यातील काही केंद्रांवर अनागोंदी सुरु असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातच जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा प्रभारी पदभार हा कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्याकडे आला. त्यांनी यात पुढाकार घेऊन गांभीर्याने शिवभोजन थाळीच्या वाटपात घालून दिलेल्या नियमांचे पालन होते कि नाही याची चौकशी केली असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने त्यांनी तात्काळ या केंद्रचालकाला नोटीस बजावली आहे.
झुणका भाकर केंद्रानंतर शिवसेनेची शिवभोजन ही महत्वकांक्षी योजना
1995 साली जेव्हा शिवसेना भाजपची सत्ता राज्यात आली होती. त्यावेळी गरिबांच्या मुखात पोषक आहार जावा आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा या उद्देशाने 1995 मध्ये युती शासनाने झुणका भाकर केंद्र सुरु केली होती. त्याकाळी केंद्रचालकांना रजिस्टर देण्यात आले होते ज्यात लाभार्थ्यांचे नाव लिहिले जायचे. त्यावेळीही त्या लाभार्थ्यांच्या यादीत अनेक मोठ्या लोकांचे नाव आल्याचे अनेक किस्से जुने जाणकार सांगतात. 10 वर्ष ही योजना चालली, त्यानंतर बंद करण्यात आली होती. पुन्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जानेवारी 2020 ला शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली. ज्यात आता अशा प्रकारे खऱ्या लाभार्थ्यांऐवजी इतर नाव टाकले जात असल्याचे समोर आले आहे.