महागाई विरोधात शिवसेनेने मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टोकाची घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय भाजप आणि शिवसेना नेत्यांनी एकमेकांची लायकी काढली. त्यामुळे दोन्ही पक्ष काडीमोड घेणार का, या चर्चेला ऊत आला होता.
सत्तात्यागाची घोषणा दसरा मेळाव्याच्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील, असं बोललं जात होतं. मात्र शिवसेनेचे आमदार फुटणार, अपक्ष किंवा राष्ट्रवादी भाजपला पाठींबा देणार, अशा शक्यतांना पूर्णविराम देण्यासाठी शिवसेना सत्तेतच राहणार आहे.
सत्तेत राहून भाजपला धारेवर धरण्याची रणनिती शिवसेना शेवटपर्यंत अवलंबणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान शिवसैनिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असले तरी शिवसेनेतील वरिष्ठ पातळीवर सत्तेतून बाहेर पडण्याची मानसिकता नसल्याचंही बोललं जात आहे. कारण शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच सत्तेतून बाहेर पडण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यावेळीही शिवसेनेत दुफळी दिसून आली होती. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेनेचेच 20 ते 22 आमदार भाजपला पाठिंबा देतील, असा दावाही अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला होता.