Aurangabad Water Crisis : औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून भाजपकडून सतत आक्रमक भूमिका घेतली जात आहे. तर याच मुद्यावरून आज शहरातील पैठणगेट ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात येणार आहे. भाजपच्या या मोर्चाला 14 अटींसह पोलिसांनी परवानगी दिली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून यावेळी भाजपचे अनेक महत्वाचे नेते या मोर्च्यात सहभागी होणार आहेत.
औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजपकडून आज दुपारी 4 वाजता हा 'जल आक्रोश' मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री दानवे, भागवत कराडांसह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत तर मोर्चामध्ये महिला दूषित पाणी आणि डोक्यावर हंडे, घागरी घेऊन सहभागी होणार आहेत. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करून पर्यायी मार्गाने वाहतुक वळवण्यात आली आहे.
जल आक्रोश मोर्चा नाही तर सत्ता आक्रोश मोर्चा - अब्दुल सत्तार
दरम्यान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हा भाजपचा जल आक्रोश मोर्चा नाही तर सत्ता आक्रोश मोर्चा आहे, असं म्हटलं आहे. भाजप सत्तेत असताना औरंगाबादकरांना योजना दिली. जर शहराला पाणी द्यायचं होतं तर सुरुवातीला योजना देऊन ती पूर्ण करायला हवी होती. उद्धव ठाकरे यांनी योजना दिली आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल काही अडथळे येतात पण लवकरच योजना पूर्ण होईल. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं नाटक आहे. हा राजकीय मोर्चा आहे, असं सत्तार यांनी म्हटलं आहे.
सत्तार म्हणाले की, रावसाहेब दानवे यांना आपल्या स्वतःच्या गावाला पाणी देता आलं नाही. किती दिवस झालं ते राजकारणात आहेत, त्यानंतर मी योजना पूर्ण करून पाणी आणलं. पण त्यांना त्यांच्या गावाला पाणी देता आलं नाही. जाफराबादला पाणी नाही, औरंगाबादची इतकी काळजी असती तर पाच वर्षे दिल्लीत सत्ता होती. महाराष्ट्रात सत्ता होती, तेव्हा त्यांनी ही योजना औरंगाबादला का दिली नाही. सत्तेपासून दूर ठेवलं म्हणून हा आक्रोश आहे. जल तर शिवसेना आणि उद्धव ठाकरे हेच देतील. मोर्चाच्या माध्यमातून चर्चा व्हावी यासाठी जल मोर्चा हे नाव दिलं आहे, असं सत्तार म्हणाले.