मुंबई: मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde News) यांच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघात सुरू असलेल्या शिवसेना-भाजप (Shivsena Vs BJP) वादावर अखेर पडदा पडला. यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadanvis) भेट घ्यावी लागली. देवेंद्र फडणवीसांनी संयमी भूमिका घेत अनावश्यक वाद निर्माण करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिलेले श्रीकांत शिंदे आता पुन्हा त्यांच्या मतदारसंघात सक्रिय होण्याची शक्यता आहे. पण हा वाद फक्त एका मतदारसंघापुरता आहे का? अजून जागावाटपाचं ठरलं नसतानाही भाजपकडून खुद्द मुख्यमंत्र्यांच्या चिरंजिवाच्या मतदारसंघावर दावा का करण्यात येतोय? की भाजपचे 'कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना' असून कल्याणवरून दबाव आणून कोल्हापूर (Kolhapur Lok Sabha) किंवा इतर जिल्ह्यातले शिवसेनेच्या ताब्यातले दोन-चार मतदारसंघ हिसकावून घ्यायचे असतील? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत.
Kalyan Dombivli BJP : कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपची चांगली ताकद
कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli Latest News) मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे हे दोनवेळा निवडून आले आहेत. तसा हा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण भाजपचीही या मतदारसंघावर चांगलीच पकड. युतीमध्ये निवडणूक लढवताना हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने भाजपचा नाईलाज आणि गोचीही. त्यामुळेच हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले जात आहेत.
कल्याण डोंबिवली मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS Kalyan Dombivli) कॅडर मोठं आहे. या मतदारसंघात त्यांचा संपर्कही चांगला आहे. त्याचाच फायदा भाजपला होतो. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपची चांगली पकड आहे. नेमकं याचमुळे शिवसेनेकडून हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.
येत्या लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पाडून घ्यावा यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यानी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. भाजपच्या रणनीतीचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur Kalyan Dombivali Visit) यांना कल्याण डोबिवली मतदारसंघात निरीक्षक म्हणून नेमण्यात आलं आहे.
पण हा मतदारसंघ सुरुवातीपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. ठाण्यातून निवडणूक लढवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी 2014 साली श्रीकांत शिंदे यांना या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यावेळी जबरदस्त मोदी लाट (Narendra Modi) असल्याने श्रीकांत शिंदे सहज निवडून आले. त्यानंतर 2019 सालीही हा मतदारसंघ शिवसेनेच्याच वाट्याला गेला. दुसऱ्या वेळीही श्रीकांत शिंदे निवडून आले.
Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांना ठाण्याचा पर्याय
कल्याण डोंबिवली हा आपल्या हक्काचा मतदारसंघ असून हा भाजपलाच मिळावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे (Thane MP Rajan Vichare) हे ठाकरे गटासोबत असल्याने त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी निवडणूक लढवावी आणि कल्याण डोंबिवली भाजपला द्यावे असा एक मतप्रवाह आहे. त्याचमुळे या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये सातत्याने वाद आणि कुरबोरी (Dombivli Shivsena Vs BJP) सुरू असतात.
Kolhapur BJP : भाजपचा कोल्हापूरवर डोळा
कोल्हापुरात भाजपचा झेंडा फडकवायचा, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला हादरा द्यायचा ही भाजपची जुनी इच्छा. पण इथेही त्यांची ताकद मर्यादित. त्यासाठी चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांना पक्षाकडून मोठी ताकद देण्यात आली. पण गेल्या निवडणुकीवेळी कोल्हापुरातील भाजपचे सर्वच उमेदवार पडले, खुद्द चंद्रकांत पाटलांना मतदारसंघ राहिला नसल्याने त्यांनी पुण्याची वाट धरली.
कोल्हापूर (Kolhapur Lok Sabha) आणि हातकणंगले (Hatkanangale Lok Sabha) या दोन्ही मतदारसंघात आता शिवसेनेचे खासदार आहेत. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशिल माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांनी शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाट असल्याने संभाव्य फायदा लक्षात घेता त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. पण या दोन्ही मतदारसंघात भाजपचे खासदार निवडणून आणण्याची भाजपची आणि चंद्रकांत पाटलांची मनोकामना आहे. त्याचाच एक भाग म्हणून धजंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना राज्यसभेवर पाठवलं. त्यांच्यामार्फत या दोन्ही मतदारसंघात कार्यकर्त्यांचं जाळं विणायचं, पक्ष बळकट करायचं काम भाजपने सुरू केलं आहे.
... म्हणूनच कल्याणवर भाजपचा जोर
कल्याण डोंबिवली या मुख्यमंत्र्यांच्या चिरंजिवाच्या मतदारसंघावरच दावा सांगायचा आणि त्यांना कोंडीत पकडायचं ही भाजपची रणनीती असल्याचं काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भूमिकाही नरम होईल आणि त्याबदल्यात जागावाटपाच्या वेळी इतर गोष्टींवर तडजोड करतील ही भाजपची राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे.
कल्याण डोंबिवली वादावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Eknath Shinde meet Devendra Fadanvis) भेट घेतल्यानंतर भाजपचा हा पहिला डाव यशस्वी झाल्याचं सांगितलं जातंय. आता जागावाटपाच्या वेळी कल्याणच्या बदल्यात भाजप शिवसेनेकडून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मागण्याची शक्यता आहे. त्याचसोबत शिवसेनेच्या ताब्यातील इतर कोणते मतदारसंघ पदरात पाडता येतील याचीही चाचपणी केली जात आहे.
Kolhapur Lok Sabha Election : कोल्हापुरातून भाजपचे उमेदवार कोण?
कोल्हापूरच्या कणेरी सिद्धगिरी मठाचे (Siddhagiri Math Kolhapur) अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज (Kadsiddheshwar Maharaj Kaneri Math) यांना गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपकडून खासदारकीचं तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण महाराजांनी राजकारणात इंटरेस्ट दाखवला नाही. आताही त्यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात यावं असा भाजपमध्ये मतप्रवाह असल्याची चर्चा आहे. ते जर तयार झाले नाहीत तर खुद्द चंद्रकांत पाटीलही खासदारकीची निवडणूक लढवू शकतात. तेही तयार झाले नाहीत तर शिवसेनेचे सध्याचे खासदार संजय मंडलिक यांना भाजपमध्ये घेऊन निवडणूक लढवण्यास सांगितलं जाऊ शकतं.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही तीच परिस्थिती आहे. जर उमेदवार मिळाला नाही तर त्या ठिकाणचे शिवसेनेचे खासदार धैर्यशिल माने (Dhairyasheel Mane) यांनाच भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा आदेश मिळाला तर त्यात नवल वाटू नये.
एकंदरीत भाजपकडून शिवसेनेच्या 'कल्याण'चं नाक दाबण्यात येत आहे आणि त्याबदल्यात कोल्हापूरच्या दोन्ही मतदारसंघावर दावा सांगण्यात येण्याची शक्यता जास्त आहे. राजकारणात दिसतं तसं नसतं हेच खरं.