गावातली निवडणूक बिनविरोध करण्यास काका-पुतण्यांना अपयश
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2017 05:37 PM (IST)
शरद पवारांचं मूळ गाव असलेल्या या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि तब्बल पाच पॅनेल एकमेकांसमोर उभे आहेत.
पुणे : पवार कुटुंबीयांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडी गावात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा चांगलाच धुरळा उडालाय. ग्रामपंचायतीसाठी एक-दोन नव्हे तर तब्बल पाच पॅनेलने एकमेकांविरोधात शड्डू ठोकले आहेत. काटेवाडी....ज्या गावातून पुणे जिल्ह्याचंच काय तर अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण चालतं असं, म्हटलं तर वावगं ठरु नये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं मूळ गाव असलेल्या या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि तब्बल पाच पॅनेल एकमेकांसमोर उभे आहेत. आजपर्यंत काटेवाडीला विविध पुरस्कार मिळाले आहेत. वीज, पाणी, रस्ते, आरोग्य यांसारख्या सुविधांनी हे गाव संपन्न आहे. पण विरोधकांचा आरोप मात्र वेगळाच आहे. थेट सरपंचपदासाठी ही निवडणूक असल्याने तृतीयपंथीही यात मागे नाहीत. यंदा ही निवडणूक बिनविरोध करण्यास खूप प्रयत्न झाले. पण लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा हक्क असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. पवार काका-पुतण्यांनी राज्यातले अनेक प्रश्न चुटकीसरशी सोडवले आहेत.पण गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रश्न मात्र त्यांना सोडवता आला नाही.