मुंबई : दुष्काळग्रस्त भागाला दिलासा देण्यासाठी राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्याबदल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. दुष्काळग्रस्त जनता आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याबद्दल मंत्रीमंडळ बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.  त्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी काही उपाययोजना सूचवत त्याची अंमलबजावणी करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती केली.

दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शिवसेनेने सुचविलेल्या उपाययोजना
·         सन 2017-2018 हंगामातील ऑफलाईन तूर व हरभरा खरेदीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे
·         विदर्भातील मालगुजारी तलाव दुरुस्तीच्या धर्तीवर मराठवाड्यातील निजामकालीन तलावांची दुरुस्ती तातडीने करावी
·         मराठवाड्यात नवीन बोअर मशिनिवर बंदी टाकण्यात यावी.
·         टँकर मंजूरीचे अधिकार तहसीलदारांकडे देण्यात यावे.
·         धरण गाळक्षेत्रात चाऱ्याचे उत्पादन करावे.
·         ठिबक/सक्षम सिंचनाला 100 % अनुदान देण्यात यावे.
·         जलयुक्त शिवार योजनेचे काम मोठ्या प्रमाणात सुरु करावे.
·         कोल्हापूर पद्धतीचे बंधारे गेट दुरुस्ती/गाळ काढावा
·         अपवादात्मक परिस्थिती वगळता,चारा छावण्याऐवजी लाभार्थ्यांना थेट अनुदान द्यावे

या मागण्यांचा गांर्भीयाने विचार करुन कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सरकारने 151 तालुक्यात गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. सोबतच  केंद्र सरकारच्या दुष्काळ मॅन्युअलनुसार आज राज्यातल्या आणखी 250 मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे.  राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून  दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.  जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरला, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन परिशिष्ट 'अ' मध्ये नमूद केलेल्या 151 तालुक्यांमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे गंभीर/मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.