मुंबई : दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाचा दसरा बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याकडे देशाचं लक्ष लागलंय. यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार? या विषयी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "आम्ही कोणालाही निशाण्यावर ठेवत नाही पण अंगावर आला तर सोडत नाही याला तुम्ही आखाडा बोला किंवा मंच बोला काहीही बोला. सव्याज फेड करण्यासाठी हा मेळावा आहे". एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत राऊत बोलत होते. या वेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर मत व्यक्त केले आहे. गेल्या वर्षभरापासून भाजप जे काही करतंय त्याचा समाचार उद्धव ठाकरे घेतील, असेही या वेळी राऊत म्हणाले.
दसरा मेळाव्यातून सैनिकांना काय प्रेरणा मिळणार ?
यंदाच्या दसरा मेळाव्याकडे देशाचं लक्ष लागलंय. यावेळी एक पाऊल पुढे टाकत नियम पाळत दसरा मेळावा साजरा करत आहोत, आमचं मत होतं शिवतीर्थावर दसरा मेळावा साजरा व्हावा. मेळाव्याची तयारी सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून भाजप जे काही करतंय त्याचा समाचार उद्धव ठाकरे घेतील.
या मेळाव्यात ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?
आम्ही कोणालाही निशाण्यावर ठेवत नाही पण अंगावर आला तर सोडतही नाही याला तुम्ही आखाडा बोला, मंच बोला काहीही बोला. सव्याज फेड करण्यासाठी हा मेळावा आहे. देशाला दिशा देण्याचं काम मेळाव्यातून होतं. शेतकरी मुद्दा आहे, सावरकरांचा मुद्दा आहे, केंद्रीय तपास यंत्रणाचा प्रकार सुरु आहे ते फार गंभीर आहे . वीर सावकरांची भाजपनं बदनामी सुरु केली आहे
केंद्र सरकारवरही मेळाव्यात टीका होणार?
महाराष्ट्रानं केंद्राला अनेक नेते दिले आहे. महाराष्ट्राबाहेर आम्ही जास्त गेलो नाही पण आता आम्ही सुरुवात केली आहे. दादर हवेली नगरमध्ये आम्ही निवडणूक लढतोय ती आम्ही जिंकू आमच्यासाठी केंद्रातल्या राजकारणासाठी मोठा मैलाचा दगड ठरेल.
अमित शाह, देवेंद्र फडणवीस गोव्यात सज्ज आहेत शिवसेनेला किती फरक पडेल?
प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे. त्यांच्याकडे लोकं, प्रचंड पैसा आहे त्यामुळे त्यांना काम करू द्या. मागच्या निवडणुकीत भाजपला सर्व करून देखील कमी जागा मिळाल्या होत्या. कॉंग्रेसच्या काही चुकांमुळे काही घडामोडी घडल्या पण अजूनही तिकडची कॉंग्रेस अजून संपलेली नाही.
गोव्याच्या निवडणूक अटीतटीची होईल ?
गोव्याच्या निवडणुकीत नक्कीच चांगली टक्कर होईल. गोव्यात कॉंग्रेसचा पाया भक्कम आहे. शिवसेनेला मानणारा वर्ग मोठा आहे.
केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा कधी थांबणार?
हे सुडाचं राजकारण आहे. कौरवांनी असंच केलं होतं, त्याचा नाश झाला. आम्ही बोलतो आम्ही आमच्या पक्षाचा विचार मांडतो. या राज्यात त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. त्यामुळे केंद्रीय यंत्रणाचा वापर करायचा आमच्यासारख्या लोकांना त्रास द्यायचा पण आमच्या पाठीला कणा आहे. तो मोडेल पण वाकणार नाही त्या परिस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला आणून ठेवलं आहे. इतर राज्यांना भूगोल आणि महाराष्ट्राला इतिहास आहे.
सूडाचं राजकारण कधी थांबणार?
केंद्रात आमची सत्ता आल्यानंतर हे सगळं थांबणार हे सगळं मोडून काढू. आज जे काही चाललंय त्याची सव्याज परत फेड केली जाईल.
केंद्रात शिवसेनेची सत्ता कशी असणार?
2024 ला बघा …!!! 2024 ला पाहा या देशाचं राजकारण पूर्णपणे बदलेलं असेल एक राष्ट्रीय राजकारणात एक वेगळाच सूर्य तळपताना दिसेल आता तुम्हाला जे काय करायचं ते करून घ्या
केंद्रात शिवसेनेचं स्थान काय असणार?
शिवसेना केंद्रात अग्रस्थानी असेल. भाजपनं मुंबई महानगरपालिकेसाठी मराठी कट्टा हा कार्यक्रम सुरु केला आहे यामुळे मराठीचा टक्का वाढेल? भाजपला आता मराठी माणसाची आठवण झाली. आतापर्यंत कुठे होते? बेळगावात मराठी माणूस हरला का हे इकडे पेढे वाटतात कसला कट्टा करतात? हे जेव्हा जेव्हा मराठी माणसांची गळचेपी झाली. तेव्हा तेव्हा शिवसेना मदतीला उभी राहिली. आज भाजपच्या आजुबाजूचे लोक अमराठी बिल्डर मराठी माणसाला घरं नाकारत आहेत. यांनी मराठी कट्टे करावेत भाजपनं हे ढोंग बंद करावं.