मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या जावयाला मिळालेल्या जामीनानंतर आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच एनसीबी जाणीवपूर्वक लोकांना बदनाम करत आहेत या आपल्या मतावर आपण ठाम असल्याचं देखील म्हंटलं आहे. तर दुसरीकडे एनसीबीने देखील मलिक यांच्या पत्रकार परिषदे नंतर आपण या संपूर्ण प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा खटखटणार असल्याचं म्हंटलं आहे.
जानेवारी महिन्यात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने तब्बल 200 किलो ड्रग्ज सापडल्या प्रकरणी अटक केली होती. त्यावेळी एनसीबीने करण सजलानी नावाच्या व्यवसायिकाच्या चौकशीतून खान यांचं नाव समोर आलं आहे. आणि त्यानंतर समीर खानच्या चौकशीत काही महत्त्वाच्या बाबी हाती लागल्यामुळेच आम्ही त्यांना अटक करत असल्याचं म्हंटलं होतं
एकीकडे नवाब मलिक यांच्या जावयाला अटक होत असताना एनसीबीने देशभरातील ठिकठिकाणी धाडी टाकल्या होत्या यामध्ये बंगळूरु, नोयडा, अयोध्येजवळ रामपूर या गावात देखील धाडी टाकल्या होत्या. या धाडीमध्ये रामपूर येथून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला होता आणि त्याचा संबंध थेट समीर खान सोबत असल्याचं देखील एनसीबीच्या वतीने सांगण्यात आलं होतं.
हा संपूर्ण प्रकारचं बनावट असल्याचा आरोप आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत करत रामपूरमधील धाडीवेळी करण्यात आलेला पंचनामा कोर्टात सादर केला नसल्याचा आरोप एनसीबीवर लावला आहे. तसेच जे पुरावे कोर्टात जावयाविरोधात सादर करण्यात आले होते. ते पुरावे देखील एनसीबी कार्यालयात तयार करण्यात आले असल्याचा आरोप मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे
समीर खान यांना 27 सप्टेंबरला जामीन मिळाल्यानंतर काल याबाबतची कोर्टाची ऑर्डर समोर आली आणि त्यानंतर त्यामध्ये नमूद बाबी मलिक यांनी आज माध्यमांसमोर आणून एनसीबी खोट्या कारवाया करुन लोकांना अडकवत असल्याच्या आपल्या आरोपावर ठाम असल्याचं म्हंटलं आहे. मागच्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक प्रकार एनसीबी करत असल्याचं देखील मलिक यांनी म्हंटलं आहे
नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर मात्र समीर वानखेडे यांनी आम्ही प्रतिक्रिया देताना आम्ही समीर खान यांच्या जामीनाविरोधात सुप्रीम कोर्टात गेलो असल्याचं म्हंटलं आहे. तर मलिक यांनी वानखेडे यांना यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. त्यामुळे आता आगामी काळात सुप्रीम कोर्टात समीर खान यांना दिलासा मिळतोय की जामीन रद्द होतोय हे लवकरच स्पष्ट होणार आहे