मुंबई : देशामध्ये सर्वात जास्त ईडीच्या धाडी या महाराष्ट्रात पडल्या असून महाविकास आघाडीच्या 14 नेत्यांवर या धाडी पडल्या आहेत. भाजपच्या एकाही नेत्यावर धाडी पडल्या नाहीत. आता ईडीनंतर इन्कम टॅक्सच्या धाडीची भानामती सुरू झाली आहे. या इन्कम टॅक्सच्या भानामतीमागे कोण आहे याचा पर्दाफाश शिवसेना लवकरच करणार असल्याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 


ईडीनंतर आता आयटीची भानामती सुरू झाली
खासदार संजय राऊत म्हणाले की, आज मुंबईत धाडीवर धाडी पडतायंत. त्यामुळे मीडियाला खूपच काम आहे. म्हणून आपण देखील एक रेड टाकावी असा विचार आम्ही केला. गेल्या काही दिवसांपासून ईडीने छापेमारी केल्यानंतर आता आयटीची भानामती सुरू झाली आहे. शिवसेनेच्या जवळच्या लोकांवर धाडी टाकायला सुरू केल्या आहेत. ज्या ठिकाणी शिवसेनेची शाखा, कार्यकर्ते आहेत, त्या ठिकाणी धाडी टाकायचं काम सुरू आहेत. 


केवळ महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ठराविक लोकांना लक्ष्य का केलं जातंय असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. महाराष्ट्रातील धाडी या सरकार पाडायच्या उद्देशाने सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 


ईडीला आणि आयटीला आतापर्यंत आम्ही 50 जणांची यादी पुराव्यासकट दिली आहे, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही असं खासदार संजय राऊत म्हणाले.


याआधी राऊतांनी 15 फेब्रुवारीला शिवसेना भवनात दुपारी चार वाजताच पत्रकार परिषद घेत भाजपसह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते. संजय राऊत यांच्या त्या पत्रकार परिषदेत त्यांचं मुख्य टार्गेट हे भाजप नेते किरीट सोमय्या होते. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं छापा टाकला होता. हा छापा जवळपास चार दिवस सुरु होता.


केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना
गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.


सबंधित बातम्या :