नवी दिल्ली : गुजरातमधल्या विमानांना उड्डाण आणि लँडिगसाठी टाईमस्लॉट देऊन महाराष्ट्रातली शहरं वाऱ्यावर सोडली जात असल्याचा आरोप करत दिल्लीत शिवसेनेचे खासदार आक्रमक झाले आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयाविरोधात आज शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी मोर्चा काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उडाण योजनेतंर्गत महाराष्ट्रातल्या नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, जळगाव अशा शहरांमधून मुंबईपर्यंतची विमानसेवा सुरु करण्याचा मानस आहे.  मात्र, फक्त मुंबई विमानतळावर विमानं उतरवण्यासाठी स्लॉट मिळत नसल्याच्या कारणावरुन ही योजना बासनातच असल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या धोरणांमुळे रिजनल कनेक्टिव्हिटीच्या उडान योजनेत नाशिक आणि महाराष्ट्रातल्या इतरही ठिकाणांवर अन्याय होत असल्याचा गोडसेंचा आरोप आहे. मुंबई विमानतळावर एअरपोर्ट टाईम स्लॉटच्या वाटपात महाराष्ट्रातल्या नाशिक, पुणे, सोलापूर या मार्गांबाबत परवानग्या मुद्दाम रखडवल्या जात आहेत. त्याऐवजी गुजरातमधल्या सुरत, कांडला, पोरबंदर या एअरपोर्टसाठी मात्र टाईम स्लॉट तातडीने दिले जातात असा, त्यांचा आरोप आहे. गुजरात राज्यातल्या तीन ठिकाणांना एअरपोर्ट स्लॉटची मान्यता देऊन महाराष्ट्राची विमान सेवा जीव्हीके कंपनीने महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडल्याचं खासदार हेमंत गोडसेंचं म्हणणं आहे. उडाण योजनेतील महाराष्ट्रातील हवाई मार्ग
  • नांदेड- मुंबई –  (जून- 2017)
  • नांदेड – हैदराबाद- (जून- 2017)
  • नाशिक (ओझर) – मुंबई (सप्टेंबर- 2017)
  • नाशिक (ओझर) – पुणे (सप्टेंबर- 2017)
  • कोल्हापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)
  • जळगाव -मुंबई (सप्टेंबर- 2017)
  • सोलापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)
संबंधित बातम्या :

अडीच हजारात 'उडाण', केंद्राची खास विमानसेवा

स्वस्त 'उडाण', हवाई प्रवास अडीच हजारात, महाराष्ट्रातील 5 शहरं