सावंतवाडी : सावंतवाडीजवळ दुरांतो एक्स्प्रेसचं इंजिन रूळावरुन घसरल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुरांतो एक्सप्रेस गोव्याहून लोकमान टर्मिनसच्या (कुर्ला) दिशेनं जात असताना सावंतवाडी आणि झाराप रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. सुदैवानं या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी कोकण रेल्वेची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेचे कर्मचारी रेल्व पॅनल ट्रॅकवर ठेवून कलर काम करत होते. त्याचदरम्यान इंजिनची या पॅनलला धडक बसून ते रुळावरुन खाली घसरलं. या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या विविध रेल्वे स्टेशनवर अडकून पडल्या आहेत.
सध्या रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून लवकरात लवकर वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
दुरांतो एक्सप्रेसचं इंजिन नेमळे-पाटकरवाडी येथे घसरल्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडले :
- कोकण कन्या एक्सप्रेस (१०११२) सायंकाळी सव्वा सातला मडगावहून सुटणार
- करमळी - एल. टी.टी (AC) (२२११६) करमळीवरुन सायंकाळी ७ वाजता सुटणार
- सावंतवाडी- दादर तुतारी एक्सप्रेस (११००४) सावंतवाडीवरुन सायंकाळी ७:३० वाजता सुटणार
- करमळी- एलटीटी सुमारे सहा तास उशीरानं धावणार
- सावंतवाडी-दादर एक्सप्रेस दोन तास उशीरा धावणार (सायंकाळी साडे पाचला सुटणारी ट्रेन सायंकाळी साडेसातला सुटणार)