मुंबई : महापालिकेचे प्रमुख आयुक्त असतात आणि त्यांची नेमणूक मुख्यमंत्री करतात. प्रस्ताव मंजूर करून अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीच्यावर आयुक्त आणि नगरविकास विभाग असून या विभागाचे प्रमुख मुंख्यमंत्री आहे. तर महापालिकेत घोटाळे झाले असतील, तर त्याला जबाबदार कोण, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.


युती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र झाले आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेवर केलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचारही घेतला.

सरकारमध्येच पारदर्शकता नाही : शेवाळे

ACB ने सर्वात जास्त कारवाई भाजपच्या नगरसेवकांवर केलेली आहे. राज्य सरकारच्या भाजपच्या 30 खात्यांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आहे. मुख्यमंत्र्यांच्या गृह खात्यातही पारदर्शकता नाही. त्यामुळे पारदर्शकता हा शब्द त्यांनी पहिल्यांदा बोलायला शिकावा, असा टोलाही राहुल शेवाळेंनी लगावला.

किरीट सोमय्यांवर हल्लाबोल

किरीट सोमय्या यांनी टँकर घोटाळ्याचा आरोप केला. मात्र त्यांच्याच मतदासरसंघात शिवाजी नगरमध्ये टँकरने पाणी पुरवण्यासहीत सोमय्या यांच्या सह्यांचे पत्र आहेत. 150 रुपयांचे टँकर्स 700 ते 800 रुपयांना विकले, असा आरोप शेवाळे यांनी केला.

मुलुंड डंपिंग ग्राऊंडच्या बाजूला आकृती डेव्हलपर्स आणि बिल्डरला फायदा पोहचवण्यासाठी ते डंपिंग ग्राउंड बंद करण्याची किरीट यांनी मागणी केली. जय श्रॉफ या कंत्राटदारावर किरीट सोमय्या यांनी कचरा घोटाळ्याचा मारिओ केला, मात्र याच जय श्रॉफसोबत कोल्ड प्ले कार्यक्रम केला, असं सांगत शेवाळेंनी मुख्यमंत्र्यांसोबतचे त्याचे फोटोही दाखवले.

संजय काकडे यांच्यावर सुद्धा घोटाळ्याचा आरोप असून भाजपने त्यांना पक्ष प्रवेश दिला. मुख्यमंत्र्यांच्या उपास्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यांना राज्यसभेवर पाठवलं. देवनार आणि मुलुंड डंपिंग ग्राऊंडचं काम भाजप खासदार संजय काकडे यांच्याकडेच होतं, असंही शेवाळेंनी सांगितलं.

''रस्ते घोटाळ्यातील आरोपींकडून भाजपला स्पॉन्सरशीप''

रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांवर चार्जशीट दाखल झाल्या आहेत. मात्र त्यांचे कोट्यावधींचे पैसे अजून महापालिकेने वितरित केले नसल्याने घोटाळा झाला, असा आरोप सोमय्या करत आहेत, असं म्हणत सोमय्यांच्या रस्ते घोटाळ्याच्या आरोपालाही शिवसेनेने उत्तर दिलं.

कचरा घोटाळ्यातील आरोपींकडून भाजपच्या कार्यक्रमांना स्पॉन्सरशिप मिळाल्याचा आरोप शेवाळेंनी केला आहे. मिठी नदी आणि माहुल गावातील अनधिकृत वांधकामाबाबत PIL किरीट सोमय्या यांनी दाखल केली. मात्र त्याचं पुढे काय झालं, कोणालाच माहित नाही, असंही ते म्हणाले.

आतापर्यंत किरीट सोमय्या हे माफियाराज संपावणार, असं फक्त म्हणत होते. मात्र माफिया कोण हे सांगत नव्हते. आता आम्ही माफियांचे नाव सांगतो, गृहखातं असलेल्या मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेवाळेंनी केली.

सोमय्यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. हिंमत असेल तर आम्ही सांगितलेल्या माफियांवर कारवाई करून दाखवावी, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईतील कंत्राटदारांचे नावं पुरोहित आणि शाह आहेत. या नावाची लिंक कुठल्या पक्षात आहे आणि त्यांचे काय संबंध आहेत, हे शोधून काढावं. हे सर्व कंत्राटदार एकाच राज्यातील, एकाच जिल्ह्यातील, एकाच तालुक्यातील आहेत. त्यांच्या गावापासून सरपंच ते आमदार - खासदार सर्व भाजपचे आहेत, असंही शेवाळे म्हणाले.