बेळगाव : शिवसेना खासदार संजय राऊत हे बेळगाव दौऱ्यावर आहेत. आज संजय राऊत यांची प्रकट मुलाखत पार पडली. या मुलाखतीत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नात्यावरही प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत, मात्र त्यांच्यातील कौटुंबिक नातं अजूनही कायम आहे.


उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे भाऊ आहेत, हे तुम्ही नाकारू शकत नाही. दोघेही ठाकरे आहेत. दोन्ही भावांनी कोणत्याही व्यासपीठावरून एकमेकांवर कधीही व्यक्तिगत टीका आजवर केलेली नाही. कुटुंब म्हणून भाऊ म्हणून आम्ही दोघेही एक आहोत, हे दोघेही भाऊ वेळोवेळी सांगतात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत, मात्र कौटुंबिक नातं अजूनही कायम आहे.


आमच्या विचाराचे नसलेल्या लोकांशी आमची मैत्री आहे. राज ठाकरे तर आमचे जवळचे आहेत, अनेक वर्ष त्यांच्यासोबत आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे माझं राज ठाकरे यांच्याशी मैत्रीचं नातं आहे आणि ते आजही टिकलेलं आहे. मैत्री असणे गुन्हा नाही. मात्र मी शिवसैनिक आहे आणि राज ठाकरे त्यांच्या पक्षासाठी काम करतात, असं संजय राऊत यांनी सांगितलं.


कर्नाटकमधील अनेक नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहेत. आमच्या भूमिका वेगळ्या असल्या तरी आम्ही नातं टिकवलं आहे, हे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आम्ही शिकल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. शरद पवार यांच्यावर बाळासाहेबांनी अनेकदा टीका केली. मात्र सुप्रिया सुळे ज्यावेळी निवडणुकीत उभ्या राहिल्या, तेव्हा आम्ही उमेदवार दिला नाही, ही आमची परंपरा आहे, असं संजय राऊत म्हणाले.


संजय राऊतांकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा

माझ्या जीवनामध्ये बाळासाहेबांशिवाय काहीच नाही. मी बाळासाहेबांशिवाय काहीच केलं नाही. त्यांचा विचार माझ्या रक्तात आणि नसानसात आहे. बाळासाहेब मला पुस्तक घेऊन द्यायचे, त्यामुळे त्यांची दिशा मला कळायची. बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर प्रेम केलं नसतं, तर देशाला संजय राऊत दिसला नसता, असंही त्यांनी सांगितलं.