नवी दिल्ली : शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.

बसण्याच्या जागेवरुन वाद झाला. त्यानंतर एअर इंडियाचा कर्मचारी आणि गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. रवींद्र गायकवाड हे आज पुण्याहून दिल्लीला जात होते. त्यांचं बिझनेस क्लासचं तिकीट होतं, मात्र त्यांना इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं. यावरुन त्यांची क्रू मेंबर सोबत वादावादी झाली.

रवींद्र गायकवाड यांचं स्पष्टीकरण

बिझनेस क्लासचं तिकीट असताना इकॉनॉमी क्लासमध्ये का बसवलं, याची तक्रार करण्यासाठी तक्रार बूक मागितलं. मात्र एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने अरेरावी करत, अंगावर धावून आला. त्यामुळे मी शिवसेनेचा खासदार आहे, हे सांगून त्याला 25 वेळा सँडलने मारलं, असं शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं.

ते एबीपी माझाशी बोलत होते.

कोण आहेत रवींद्र गायकवाड?


•    रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत
•    लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.
•    उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचीत आहेत
•    रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते.
•    दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे.
•    तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला.