Naresh Mhaske : भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याकडून काही अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. यामध्ये परळीचा सांस्कृतिक पॅटर्न असे म्हणत आमदार धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं. यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने काल पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी माफी मागावी, तसेच यातील दोषींवक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्राजक्ता माळी यांचं ( Prajakta Mali) समर्थन केलं आहे. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले नरेश म्हस्के?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर, बीड शहरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह हजारो नागरिकांनी ' मूक मोर्चा' काढला. हे आंदोलन निश्चितच योग्य आहे. न्याय मिळवण्यासाठी आणि हत्येच्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणे आवश्यक आहे आणि न्यायही मिळेलच. याबाबत आमदार सुरेश धस यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी समर्थन आणि स्वागतच करतो असे म्हस्के म्हणाले. 

 

Continues below advertisement

प्राजक्ता माळी यांचं नाव विनाकारण गोवण्यात येतयं

पण यामध्ये मराठी  महिला कलाकार प्राजक्ता माळी यांचं नाव विनाकारण गोवण्यात येत आहे. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय निराधार आरोप लावले जात आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. केवळ मराठी कलाकार आहेत, म्हणून नव्हे तर कोणत्याही महिलेची अशा पद्धतीने मानहानी करणं चुकीचं आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. महिलांचा सन्मान हे आपलं कर्तव्य असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले. 

कलाकार मंडळींवर आरोप लावणं चुकीचं

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करावं मात्र, या कलाकार मंडळींवर आरोप लावणं आणि त्यांची बदनामी करणं हे पूर्णपणे अनुचित असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले. सर्व संबंधित लोक या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतील. तसंच लावण्यात येणारे आरोप थांबवतील आणि त्या कलाकारांची माफी मागतील अशी अपेक्षा आहे असं म्हस्के म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले म्हणत पंकजा मुंडेंची अभिनेत्रीसाठी साहित्यिक भाषेत पोस्ट; सुरेश धसांना टोला