सोलापूर : तुला बांधून आणून उलटं टांगून मारेन, अशी धमकी शिवसेनेच्या आमदाराने दिल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. रोहिदास कांबळे नामक शेतकऱ्याने शिवसेनेचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्यावर हा आरोप केला आहे. या प्रकरणी आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करुन सुरक्षेची मागणी केली आहे.
आपल्या समर्थकांच्या विरोधातील पोलिस तक्रार मागे घेण्यासाठी आमदार नारायण पाटील यांनी आपल्याला धकमी दिली, असा आरोप शेतकरी रोहिदास कांबळे यांनी केला आहे.
"तुला बांधून आणून उलटं टांगून मारेन आणि तुला कोणी सोडवायला येईल ते बघू. तुझं जगणं मुश्किल करेन", अशी धमकी दिल्याची तक्रार शेतकरी रोहिदास कांबळे यांनी आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात केली आहे.
आमदार नारायण पाटील यांनी मोबाईल संभाषणातील आवाज आपलाच असल्याचं मान्य केलं आहे. मात्र, शेतकऱ्याला धमकावण्यचा उद्देश चांगला असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, आमदार नारायण पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, बसपाच्या शिष्टमंडळाने सोलापूर ग्रामीण पोलिसांना निवेदन दिलं आहे.