उस्मानाबाद : माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची नाराजी अद्याप कायम आहे. विकासकामांसाठी पैसे नसताना राज्य सरकार कोणतेही काम करू शकणार नाही. केंद्र सरकारच्या मदतीशिवाय राज्य सरकारचं पानही हलणार नाही, एकही योजना पूर्ण होणार नाही, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. तानाजी सावंत भूम येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात गुरुवारी बोलत होते. राज्य सरकारपेक्षा तानाजी सावंत यांना जास्त विश्वास केंद्रातील सरकारवर आहे का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.


महाराष्ट्र विकास अघाडी सरकारमधील अनेक मंत्री मराठवाड्याच्या विरोधात आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या नेतृत्वाने मराठवाडा विरोध करण्यास सुरुवात केली आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या पहिल्याच दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर तानाजी सावंत यांची अप्रत्यक्ष जोरदार टीका केली आहे.


पाण्याच्या बाबतीत मराठवाड्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मराठवाडा पेटून उठेल. राष्ट्रवादीने मराठवाड्यावर नेहमीच अन्याय केला. मराठवाड्याला आम्ही मंजूर केलेल्या 25 हजार कोटींच्या वॉटर ग्रीड योजनेला राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांने स्थगिती दिली. पाण्याच्याबाबतीत जर मराठवाड्यावर अन्याय झाला तर मी गप्प राहणार नाही. त्यावेळी मी कोणताही पक्ष आणि कुणाचीही काळजी करणार नाही.


रविंद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती


शिवसेनेचे माजी मंत्री रवींद्र वायकर यांची अखेर मुख्यमंत्री कार्यालयात म्हणजेच CMO मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य समन्वयक अधिकारी असं विशेष कॅबिनेट दर्जाचं पद तयार करून नाराज रवींद्र वायकर यांचं थेट मुख्यमंत्री कार्यालयात पुनर्वसन करण्यात आलं आहे. यामुळे शिवसेनेतील इतर नाराज आमदारांसह मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.


गेल्या अनेक दिवसांपासून नवं CMO मंत्रालय तयार होणार असल्याची चर्चा होती. त्याठिकाणी अनिल परब यांची वर्णी लागणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती होती. मात्र मागच्या युतीच्या सरकारमध्ये राज्य मंत्री पद भूषवलेल्या रवींद्र वायकर यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये डावलल्यामुळे वायकर यांनी मातोश्रीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कोणाची वर्णी लागणार यासाठी वायकर विरुद्ध परब असा सुप्त संघर्ष पेटला होता. पण ठाकरे परिवाराशी असलेले संबंध आणि वजन वापरुन वायकर यांनी बाजी मारली.