नागपूर : रॅश ड्रायविंग करणाऱ्या गुंडांची वस्तीतील नागरिकांनी मिळून केली हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. या गुन्हेगाराच्या रॅश ड्रायविंग आणि इतर दुष्कृत्यांची माहिती अनेक वेळेला पोलिसांना देऊनही काहीच कारवाई होत नसल्यामुळे वस्तीतील नागरिकांनी कायदा हातात घेतला. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत नागपुरात दोन हत्या झाल्याने शहरात चाललंय तरी काय? असा प्रश्न विचारला जात आहे. नागपुरात याआधी देखील नागरिकांकडून गुंडाची हत्या करण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या प्रकारामुळे गुंडांच्या हत्येचा हा 'नागपूर पॅटर्न' पुन्हा चर्चेत आला आहे.
नागपुरातील शांतीनगर परिसरातील नालंदा चौकात कायद्याची लक्तरे वेशीवर टांगणारी ही घटना घडली आहे. आशिष देशपांडे नावाचा गुन्हेगार वस्तीतील अरुंद गल्ल्यांमधून अत्यंत वेगाने आणि धोकादायक पद्धतीने एक्टीव्हा चालवायचा तसेच वस्तीतील लोकांना अनेक प्रकारे त्रास ही द्यायचा. काल रात्री ही त्याने तोच प्रकार केल्याने ममता ढोक नावाच्या महिलेने त्याला जाब विचारला. त्यावर चिडलेल्या आशिषने ममता ढोक यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढवला. ममता यांनी आपल्या बचावासाठी पोलिसांना फोन केला. पोलीस येतील या भीतीने आशिषने तिथून काढता पाय घेतला. मात्र पोलीस येऊन गेल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास आशिष पुन्हा वस्तीत आला आणि ममता यांच्यासह इतर महिलांना अश्लील शिवीगाळ करू लागला. हातात चाकू घेतलेला आशिष वस्तीतल्या लोकांना धमकी देत असल्याने वस्तीतील तरुणांनी मिळून आशिषवर हल्ला केला. फरशी, विटा, लोखंडी रॉड आणि चाकूने आशिषला जबर मारहाण करण्यात आली. जमावाकडून झालेल्या या हल्ल्यात आशिषचा मृत्यू झाला. या आधीही वस्तीतल्या लोकांनी खासकरून महिलांनी अनेक वेळेला आशिषच्या गुंडगिरी संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी वेळीच लक्ष न घातल्यामुळे कालची घटना घडल्याचा आरोप वस्तीतील महिलांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी (ता. 11) चिखली लेआउट परिसरात चिखल साफ करण्याच्या मुद्द्यावर सिक्युरिटी गार्डची हत्या करण्यात आली होती. मेहता वे ब्रिज या कंपनीच्या आवारात ट्रकची ये जा असल्यामुळे झालेला चिखल कोण साफ करणार या मुद्द्यावर कंपनीचा कॉम्प्युटर ऑपरेटर आणि सुरक्षारक्षक यांच्यात भांडण झालं. हा वाद इतका विकोपाला गेला की कॉम्प्युटर ऑपरेटरने जवळ ठेवलेले फावडे उचलून सुरक्षारक्षक नारायण भीवपूरकर यांची हत्या केली. सीसीटीव्हीमध्ये ही थरारक घटना कैद झाली होती.
याप्रकरणी पोलिसांनी सुरज मेश्राम, निखिल मेश्राम, रॉकी, आशु आणि आदर्श या तरुणांना अटक केली आहे. तर काही आरोपी अजूनही फरार आहेत. आशिषकडून वादावादी केली जात आहे ह्या संदर्भात महिलांचा फोन आल्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र आशिष सापडला नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.
नागपुरात 'रॅश ड्रायविंग' करणाऱ्या गुंडाची नागरिकांनी मिळून केली हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2019 04:52 PM (IST)
नागपुरातील शांतीनगर परिसरातील नालंदा चौकात कायद्याची लक्तरे वेशीवर टांगणारी ही घटना घडली आहे. आशिष देशपांडे नावाचा गुन्हेगार वस्तीतील अरुंद गल्ल्यांमधून अत्यंत वेगाने आणि धोकादायक पद्धतीने एक्टीव्हा चालवायचा तसेच वस्तीतील लोकांना अनेक प्रकारे त्रास ही द्यायचा.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -