गारपीट नुकसानभरपाई लगेच दारात येऊन द्यायची का? : रावते
एबीपी माझा वेब टीम | 17 Feb 2018 10:31 AM (IST)
दिवाकर रावते वाशिमला गारपिटीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका शेतकऱ्याने भरपाईची मागणी केल्यामुळे त्यांचा पारा चढला.
वाशिम : मराठवाडा, विदर्भात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. गारपिटीची नुकसानभरपाई काय लगेच शेतकऱ्यांच्या दारात येऊन द्यायची का? असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे. वाशिम जिल्ह्यात पाहणी करताना रावतेंनी विचारलेल्या प्रश्नामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दिवाकर रावते वाशिममधील रिसोड तालुक्यातील नेतसा परिसरात गारपिटीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका शेतकऱ्याने भरपाईची मागणी केल्यामुळे रावतेंचा पारा चढला. काय म्हणाले रावते? 'गारपीट 11 तारखेला झाली.. चार दिवस झाले. मग काय लगेच दरवाजात नोटा घेऊन उभं राहायचं? बोलायचं.. पण बोलताना जरा काहीतरी भान.. काल पंचनामे आले.. काल (नुकसान भरपाई) जाहीर झाली.. मग ती दरवाजात लगेच येते? बोलायचं नाही जास्त. करतात ना, तेव्हा तुम्ही असे बोलता. काय भान ठेवा ना. मी आलोय ना तुमच्यासाठी. काय टपला मारायला बोलवलंय? मी रात्रंदिवस फिरतो. मला नाही सांगायचं. मला नुकसान कळतं.' खरं तर शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न करते. मात्र त्यांचेच मंत्री शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक भाषा वापरत असतील, तर आता उद्धव ठाकरे त्यांच्यावर काय कारवाई करणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.