मुंबई : भाजप मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेसाठी तयार ही समंजसपणाची भूमिका असल्याचं शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावरही चर्चा होईल, शिवसेनेने चर्चेला तयार व्हावं, या सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी यांनी प्रतिक्रिया दिला आहे. मात्र भाजपने युतीमध्ये जे ठरलंये ते लेखी द्यावं, त्यानंतर चर्चेला सुरुवात होईल, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

कुठल्याही मुद्द्यावर चर्चेसाठी भाजपने तयारी दर्शवली आहे. ही भूमिका आधी घेतली असती तर सत्तेचा तिढा वाढला नसता, एवढ्यात सरकार स्थापन झालं असतं. शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही हे भाजपंचं म्हणणं चुकीचं आहेत. कारण उद्धव ठाकरे-अमित शाह यांच्या बैठकीत जे ठरलं होतं, तोच प्रस्ताव आहे, याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली.

सध्याच्या राजकीय परिस्थितीला शिवसेना जबाबदार नाही. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. उद्धव ठाकरे-अमित शाह यांच्यात जे ठरलंय त्याप्रमाणे करा. चागंल सरकार यावं हे सर्वांना वाटत आहे. मात्र मुख्यमंत्री लोकांच्या मनातील असावा. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल ही आमची आधीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाच स्थापन होईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.



सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

कुठल्याही मुद्द्यावर चर्चा होईल, मात्र त्यासाठी शिवसेनेने चर्चेला तयार व्हावं. भाजपने प्रस्ताव दिलेला आहे, मात्र जाहीर करणार नाही. सत्तास्थापन करताना जनतेच्या हिताच्या आड येणार नाही. उद्यापासून जनतेच्या हिताच्या कामाला लागू, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. येत्या 8 नोव्हेंबरच्या आत सत्तास्थापनेवर तोडगा निघाला नाही, तर भाजप 2014 प्रमाणे एकटी शपथविधी करेल का? या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. विश्लेषण झालं आहे, कोणत्याही क्षणी गोड बातमी येईल. सरकार महायुतीचंच बनणार आहे. जनतेचा कौल महायुतीला मिळाला आहे त्याचा आदर करुन आम्ही सरकार बनवणार आहोत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.