मुंबई : राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला जनादेश दिला आहे. या जनादेशाचा आदर करुन लवकरात लवकर सरकार स्थापन करु, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. भाजपची कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेकडून लवकरच प्रस्ताव येईल. शिवसेनेच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भाजपची दारं नेहमी खुली आहेत, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. मात्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातचं सरकार स्थापन होईल, हे सांगायला चंद्रकांत पाटील विसरले नाहीत.
सर्व मित्रपक्षांना घेऊन महायुती लवकरच सरकार स्थापन करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला केंद्रातूनही समंती मिळाली आहे. संपूर्ण भाजप मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. संसदीय समितीनेही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी दिली आहे, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
भाजप नेत्यांनी शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र मुख्यमंत्री पदाबाबत काहीही तडजोड होणार नाही, असं सूचवलं आहे. भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्षाचं मुळ कारण मुख्यमंत्रीपद आहे. मात्र भाजपदेखील मागे हटण्यास तयार नाही असं दिसून येत आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Sanjay Raut UNCUT | "मी पक्षाचं काम करतो, टीकेचा फरक पडत नाही" तरुण भारतमधील टीकेला संजय राऊतांचं उत्तर