Sanjay Raut : राज्यातील सरकारला खोके सरकार म्हणून देशात मान्यता मिळाली आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) हे तसे मूळ काँग्रेसी आहेत. तेही पक्षांतर करुनच भाजपमध्ये (BJP) गेले आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील शिवसेनेत होते मग ते भाजपात गेले आहेत. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचं नातं जुळलं असेल, असा टोला राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावला. त्यांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.


'या' मुद्यावरुन जनता भाजपचा पराभव करेल


बरोजगारी आणि महागाई हा संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. या मुद्यावर भाजप 2014 ला सत्तेत आले होते. त्यामुळं जनता जर सावध असेल तर याच मुद्यावरुन भाजपचा पराभव करेल असेही राऊत म्हणाले.  छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना करणाऱ्यांविरोधात सर्वांनी एकत्र यावं अशीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भूमिका असल्याचेही राऊत म्हणाले. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) असतील किंवा उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) असतील त्यांची जी भावना हीच महाराष्ट्राची भावना आहे. शिवसेनेने आणि महाविकास आघाडीने राज्यपालांच्या वक्तव्यांच्या विरोधात सातत्यानं आवाज उठवण्याचे काम केलं असल्याचे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात अल्टिमेटम दिला आहे. भाजपकडून शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं अपमान केला जात आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून जत सोलापूर घेण्याची भाषा होत आहे, या विरोधात आपण सर्वांनी एकत्र यावं असेही राऊत म्हणाले.


आम्हाला बोलावलं नाही कारण आम्ही कधी पक्षांतर केलं नाही


आसामच्या मुख्यमंत्र्यांनी 40 आमदारांना कामाख्या देवीच्या दर्शनासाठी बोलावलं आहे, असा गेलेल्या आमदारांचा दावा आहे. आम्हाला कधी त्यांनी बोलावलं नाही, कारण आम्ही कधी पक्षांतर केलं नाही, असा टोलाही राऊतांनी शिंदे गटाला लगावला. कामाख्या देवी ही न्यायदेवता आहे, अशी आख्यायिका आहे. त्यामुळं या 40 लोकांचा न्याय देखील कामाख्या देवी करेल असे राऊत म्हणाले. अन्याय करुन हे लोक तिथे गेल्याचे ते म्हणाले.


महाराष्ट्रात सगळ्यांना जागा पण महाराष्ट्राला...


नवी मुंबईत आसाम भवन आहे. महाराष्ट्रात सगळ्यांना जागा आहे. पण महाराष्ट्राला कधी कोणी जागा देणार आहे का? असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात गुण्यागोविंदानं आसामची जनता राहत आहे. त्यांचा आम्ही सन्मान करतो असेही राऊत म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sanjay Raut : 25 खासदार, 115 आमदार अन् स्वबळावर सेनेचा मुख्यमंत्री, संजय राऊतांची डरकाळी