Sanjay Raut on Kirit somaiyas bail : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयानं किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. तसेच, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. दिलासा घोटाळा हा न्याय व्यवस्थेला अलीकडेच लागलेला डाग आहे. दिलासा घोटाळा हा अल्कायदा आणि कसाबपेक्षा भयंकर असल्याचे राऊतांनी ट्वीट करुन म्हटले आहे.


आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यात अटकेची टांगती तलवार असल्याने किरीट सोमय्या हे नॉट रिचेबल होते. जामीन मिळताच सोमय्या पुन्हा एकदा प्रकट झाले आहेत. त्यांना जामीन मिळताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या या जामिनावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.


ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलंय 


दिलासा घोटाळा  हा न्याय व्यवस्थेला अलीकडेच लागलेला डाग आहे. दिलासा घोटाळा अल्कायदा आणि कसाबपेक्षा भयंकर आहे. एकाच पक्षाचे ठग दिलासा घोटाळ्याचे लाभार्थी कसे असू शकतात? हा प्रश्नच आहे. विक्रांत निधी अपहार प्रकरण संपलेले नाही. चोरांना सजा नक्कीच होईल. wait and watch! असे ट्वीट करत राऊतांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. हे प्रकरण संपलेलं नसल्याचे राऊतांनी म्हटले आहे.




आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली निधी गोळा करुन अपहार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यापासून सोमय्या पिता-पुत्र नॉट रिचेबल होते. आयएनएस विक्रांत घोटाळ्यातील रक्कम अधिक असल्याने मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशाने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी सत्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने मंगळवारी सोमय्यांचे मुलुंडमधील निवास्थान आणि कार्यालय गाठले. अटकेची टांगती तलवार असल्याने सोमय्या पितापुत्र घरी नव्हते. अखेर पोलिसांनी हे समन्सचे पत्र सोमय्या यांच्या घराच्या दरवाजावर चिकटवले. मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमय्या यांच्या कार्यालयाची झडतीसुद्धा घेतली व काही कागदपत्रांची तपासणी करत उपस्थित कर्मचार्‍यांची चौकशी केली होती. त्यानंतर न्यायालयानं किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे.