मुंबई : ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, राष्ट्रपती राजवट अशा धमक्या दिल्या जात आहेत. मात्र आता महाराष्ट्रातील आता कुठल्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही. सरकारी यंत्रणांचा वापर करून फोडाफोडीचे राजकारण यांनी केले आहे, असा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत एबीपी माझाच्या कट्ट्यावर बोलत होते.

ते म्हणाले की, या राजकारणामुळे राज्यातील जनतेने विरोधात बंड केले आणि निकालाचे आकडे बदलले. शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाला निवडणुकीत मोठा आकडा मिळाला हे त्यांचंच फलित आहे. निवडणुकीआधी पाच आमदार ही निवडून येणार नाहीत असं चित्र तयार केलं गेलं होतं मात्र त्या पक्षाला आज पूर्वीपेक्षाही चांगल्या जागा मिळाल्या, असे ते म्हणाले. विशेषतः शरद पवारांबाबत ईडीची नोटीस प्रकरण घडायला नको होती, असेही ते म्हणाले. दरम्यान 'हीच ती वेळ, आता नाहीतर कधी नाही' असे म्हणत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असेही ते म्हणाले.

तरुणांनी नेतृत्व केलं पाहिजे असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. मात्र मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय हा उद्धव ठाकरे हेच घेतील असेही त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीआधी आम्ही यापुढे स्वबळावर लढू असे आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितले होते. आम्ही 288 जागा लढण्याची तयारी केली होती. मात्र भाजपला असं वाटलं की शिवसेना सोबत नसेल तर आपण महाराष्ट्रात पराभूत होऊ. यामुळे युतीचा प्रस्ताव घेऊन अमित शाह स्वतः आले. यावेळी युती करण्यासाठी एक संधी घेण्याचे ठरले.  मात्र तरीही आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती, असेही ते म्हणाले.

युतीचा फॉर्म्युला ठरत असताना ब्ल्यू सी नावाच्या हॉटेलला अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे बसले होते. यावेळी  देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की, विधानसभेला आम्ही 50-50 फॉर्म्युल्याने लढू. निवडणुकीनंतर पद आणि जबाबदाऱ्यांचे वाटप आम्ही समसमान करू. याचा अर्थ मुख्यमंत्री पद देखील अडीच अडीच वर्ष द्यायचं असा होतो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल अशी कमिटमेंट पक्षप्रमुखांनी केली होती. कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी आम्ही काहीही करू.  शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, असे राऊत यांनी ठामपणे सांगितलं.