ठाणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय नेत्यांसोबतच्या भेटीगाठी सध्या चर्चेचा विषय आहे. एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेणार आहेत. एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र राजकारणात कुणीही कुणालाही भेटू शकतं, असं शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
कुणी कुणाला भेटावं यावर बंदी नाही. एकनाथ खडसे सर्वांचे मित्र आहेत. शिवसेना-भाजपची युती असताना त्यांनी अनेक नेत्यांसोबत एकत्र काम केलं आहे. गेल्या अनेक वर्षाचे स्नेहसंबध आहेत. त्यामुळे या भेटींचा वेगळा अर्थ काढू नये. लोकशाहीत कुणीही कुठेही जाऊ शकतो. कुणी कुणाला भेटावं याचा सर्वांना अधिकार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
यावेळी एकनाथ शिंदेनी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरही वक्तव्य केलं. खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील. महाविकास आघाडीची चर्चा सुरु आहे. एकमेकांना भिडण्यासाठी इथे कुस्त्या खेळायच्या नाहीत. विकास प्रकल्पाला कुठेही स्थगिती दिलेली नाही, आढावा घेण्याचे काम सुरु आहे, असा टोला एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला. तर 170 आमदारांचं आम्हाला समर्थन आहे. भविष्यात हा आकडा आणखी वाढेल. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राला गोड बातमी मिळाली आहे, असा चिमटा एकनाथ शिंदेंनी सुधीर मुनगंटीवार यांना काढला.
- नाराज एकनाथ खडसेंची समजूत काढण्यासाठी भाजपमध्ये हालचाली, 'या' नेत्यांवर जबाबदारी
- एकनाथ खडसेंनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली उद्या मुख्यमंत्री ठाकरेंना भेटणार
शरद पवारांना भेटल्यानंतर खडसे आज उद्धव ठाकरेंना भेटणार
एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा सुरु असताना काल (सोमवार) त्यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली. पवार आणि खडसे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. एकनाथ खडसे शिवसेनेत प्रवेश करण्याचीही चर्चा सुरु आहे. मात्र आपली नाराजी दिल्ली दरबारी मांडायला खडसे दिल्लीला गेले होते. तिथे भाजप नेत्यांनी खडसेंना भेटण्यासाठी वेळ न दिल्याने खडसे पुन्हा मुंबईत परतले. महत्वाची बाब म्हणजे आज खडसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या दोन्ही भेटींसाठी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील एका सिंचन प्रकल्पाचं कारण पुढे केलं आहे. पण भाजपमध्ये सातत्याने अपमान होत राहिल्यास वेगळा विचार करेल, असं म्हणणारे खडसे आता शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.