Attack on Rohini Khadse :  जळगाव जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवळकर यांच्या चारचाकी वाहनावर अज्ञात इसमांनी दगडफेक केली असल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यानंतर जळगावातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 


रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रम नंतर मुक्ताईनगरकडे येत असताना सूतगिरणी परिसरात दोन मोटार सायकलवर आलेल्या चार अज्ञातांनी दगडफेक केली.  या दगडफेकीनंतर त्यांनी  रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने कार रस्त्यावरून बाजूला नेत रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केले. त्यामुळे रोहिणी खडसे आणि चालक सुखरूप बचावले असल्याची माहिती खडसे कुटुंबीयांकडून देण्यात आली. हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील आठवड्यापासून रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात आवाज उठविला असल्याने त्यातून हा हल्ला झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  


राजकारण तापणार?


बोदवड नगरपंचायत निवडणुकीनंतर राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत. रोहिणी खडसे यांनी महिलांना कोणी त्रास देणार असेल तर चोप दिल्या शिवाय सोडणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण आणखीच तापले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचे म्हटले.  आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे परिवारात सध्या सुरू आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे राजकारण वातावरण आणखीच तापण्याची शक्यता आहे. 


आमदार पाटील यांच्याकडून निषेध


मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. या  हल्ल्याची उच्चस्तरीय तपास समिती मार्फत चौकशी करण्यात यावी ,अशी मागणी विधानसभेत करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे.


पाहा व्हिडिओ: रोहिणी खडसे यांच्या कारवर हल्ला