Sanjay Gaikwad on Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत (CM Eknath Shinde) केलेल्या गौप्यस्फोटाचा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी जोरदार समाचार घेतलाय. बालिशपणा थांबवा आणि आत्मपरीक्षण, अशी खरमरीत टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवर केलीय. एकनाथ शिंदे हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत, ते कुणालाही घाबरत नाहीत म्हणून ठाकरे कुटुंबानं बालिशपणासारखी वक्तव्य करू नये, असा सल्ला संजय गायकवाडांनी दिला आहे. 


संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?


आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य टीव्हीवर पाहून मला हसू येतंय, ज्यावेळी आम्ही शिंदे साहेबांसोबत बाहेर पडलो, त्यावेळी तुम्ही भाजपच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिलाय, असा व्हिडीओ व्हायरल केला. अन् आता तुम्ही म्हणताय की, एकनाथ शिंदे घाबरून बाहेर गेलेत. एकवेळ एकनाथ शिंदेंचं सोडा, पण त्यांच्याबरोबर गेलेले चाळीस आमदारही घाबरुन गेले का? यांना पण तुम्ही जेलमध्ये घालणार होतात का? म्हणूनच हे सगळे नाटक सुरु आहे. एकनाथ शिंदे हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत, ते कुणालाही घाबरत नाहीत, त्यामुळेच ठाकरे कुटुंबाने बालिशपणासारखी वक्तव्य करू नये, असा सल्ला गायकवाडांनी दिलाय. 


तर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही समाचार घेतला. बंडाला आणि उठावाला आता नऊ महिने होऊन गेलेत. किती दिवस एकाच विषयावरून आम्हाला छळणार आहात, असा सवालही त्यांनी केलाय. 


आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?


आदित्य ठाकरे यांनी एक दिवसाचा हैदराबाद दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी गीतम विद्यापीठाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिवसेनेतील फूट आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत मोठा खुलासा केला. ते म्हणाले की, "शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी एकनाथ शिंदे मातोश्रीवर आले होते. ते रडायला लागले आणि म्हणाले की, भाजपसोबत हातमिळवणी करा, अन्यथा ते आम्हाला जेलमध्ये टाकतील. मी भाजपसोबत नाही गेलो तर तुरुंगात जाईन, असंही त्यावेळी ते सांगत होते."


दरम्यान, 20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली. त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे 16 आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या 40 आमदारांसह 52 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणातील निकाल येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे.